
परळ–भोईवाडा विभागात मतदानाच्या दिवशीच टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्याचा निवडणूक आयोगाचा डाव शिवसेनेने आज उधळून लावला. मतमोजणीचा दिवस उद्या असल्याने टपाली मतपत्रिका आजच बाहेर काढणे नियमाविरुद्ध असून तसे केल्यास हेराफेरीचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेने विरोध दर्शवला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी माघार घेत टपाली मतपत्रिकांच्या पेट्या उद्याच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
परळ–भोईवाडा विभागातील प्रभाग क्रमांक 200 ते 206 चे टपाली मतदान परळ–भोईवाडा उच्च प्राथमिक शाळेमध्ये 10 ते 12 जानेवारीदरम्यान घेण्यात आले होते. टपाली मतपत्रिकांचे बंद लिफाफे संबंधित प्रभागांच्या मतपेट्यांमध्येच टाकणे आवश्यक होते. मात्र मतदारांकडून घाईगडबडीत ते अन्य प्रभागांच्या मतपेट्यांमध्ये टाकले गेले असण्याची शक्यता व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी त्या मतपेट्या आजच उघडण्याचा घाट घातला होता. याबाबतचे पत्र त्यांनी सर्व उमेदवारांना दिले होते तसेच दुपारी 3 वाजता या कार्यवाहीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असेही कळवले होते.
हे पत्र मिळताच शिवसेना उपविभागप्रमुख गजानन चव्हाण तसेच शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 203 च्या उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी प्रथमेश जगताप यांनी तातडीने आक्षेप नोंदवत निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिले. मतमोजणी उद्या होणार असल्याने आजच मतपेट्या उघडणे योग्य ठरणार नाही. तसेच प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांची मतमोजणी एकाच सभागृहात होणार असल्याने त्यावेळीच पेट्या उघडून टपाली मतपत्रिका वेगळी करून संबंधित प्रभागांमध्ये देता येतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतपत्रिकांच्या पेट्या उद्या, मतमोजणीच्या दिवशीच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.




























































