वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथील बांधकाम व्यावसायिक किशोर बाबूराव लोहकरे यांची निघृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्याच्या गोडवा गावानजीक असलेल्या जंगलात आढळला. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोहकरे यांच्या गाडीच्या चालकास संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी संशयिताच्या घरावर दगडफेक करून त्याची दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणाव असून रांजणगाव शेणपुंजी, कमळापूर भागात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कमळापूर येथील बिल्डर किशोर लोहकरे (40) हे त्यांचा चालक जावेद सत्तार शेख (40, रा. कमळापूर) सोबत 17 सप्टेंबर रोजी मुंबईला गेले होते. मुंबईला जाताना त्यांनी सोबत १० लाख रुपये घेतले होते. 19 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता चालक जावेद शेख हा परतला. मात्र किशोर लोहकरे आले नाहीत. लोहकरे हे मुंबईलाच थांबल्याचे जावेदने सांगितले. लोहकरे यांनी सोबत नेलेले 10 लाख रुपये जावेदने आशा लोहकरे यांच्याकडे दिले. लोहकरे यांची कार उभी करून जावेद हा त्याच्या घरी निघून गेला.
26 सप्टेंबर रोजी किशोर लोहकरे यांनी फोन करून आपण इंदोरला असल्याचे पत्नी आशाला सांगितले. जावेद शेख याच्याकडे 10 लाख रुपये देऊन त्याला कार घेऊन इंदोरला येण्याचा निरोपही त्यांनी दिला. त्यानुसार आशा यांनी जावेदकडे 10 लाख रुपये दिले. जावेद हा कार आणि पैसे घेऊन दुपारी चार वाजता इंदोरकडे रवाना झाला. इंदोर येथे जावेदने आपल्याला पैसे दिल्याचे किशोर यांनी पत्नी आशाला कळवले. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी जावेद हा कार घेऊन कमळापूरला परतला.
लोहकरे यांचा मोबाईल बंद
27 सप्टेंबर रोजी आशा यांनी किशोर यांच्या मोबाईलवर अनेकदा कॉल केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे घाबरलेल्या आशा यांनी नातलग, मित्रांकडे किशोर यांचा शोध घेतला. कुठेच ठावठिकाणा लागत नसल्यामुळे आशा यांनी 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे धाव घेतली.
मोबाइल लोकेशनमुळे लागला तपास
तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सर्वात प्रथम किशोर लोहकरे यांचे मोबाईल लोकेशन तपासले. मध्यप्रदेशातील खांडवा येथे त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आढळून आले. या माहितीवरून लोहकरे यांचे नातलग, जावेद शेख तसेच पोलिसांनी खांडवा गाठले असता 8 ऑक्टोबरला त्यांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
खोट्या जबाबामुळे अडकला जावेद
किशोर लोहकरे यांनी ओंकारेश्वराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती जावेदने पोलिसांना दिली होती. कोलकात्याला जायचे आहे, असे लोहकरे यांनी जावेदला सांगितले. पण कोलकात्याला जाण्यास त्याने नकार दिला आणि तो घरी परतला. जावेदच्या या जबाबावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी जावेदच्या मोबाईलचे सीडीआर तपासले असता त्यात अनेक संशयित मोबाईल क्रमांकावर जावेदने कॉल केल्याचे उघड झाले.
रांजणगावात बंद, कमळापुरात दगडफेक
किशोर लोहकरे यांचा खून झाल्याची माहिती औद्योगिक परिसरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त जमावाने जावेद शेख याच्या घरावर दगडफेक करून त्याची दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दत्तात्रय गिते यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.