तिवरांची कत्तल करून भाईंदरमध्ये बेकायदा बांधकामे; पालिकेवर गुन्हा

तिवरांची कत्तल करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेसह क्रिकेट टर्फ चालक-मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभाग व महसूल विभागाच्या पाहणीत याचा भंडाफोड झाला आहे. या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने क्रिकेट टर्फ, पत्र्याच्या झोपड्या, लग्नाचे मंडप, स्नुकर पार्लर, कंटेनर, शौचालय, सोसायटीच्या कंपाऊंड भिंती उभारण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून केलेल्या बांधकामप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर 2018 रोजी रिट पिटिशन व जनहित याचिकेवरील अंतिम आदेशावेळी कांदळवनापासून 50 मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असल्याचे निर्देश दिले. मात्र तरीही मीरा रोड पूर्वेच्या पेणकरपाडा परिसरातील कांदळवन भागात तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्याठिकाणी भरणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी नवयुवान, अमन शांतीनगर, आकाशगंगा अपार्टमेंट, आनंदछाया, प्यारा मेडिकल इन्स्टिट्यूट या सोसायट्यांची संरक्षण भिंत तसेच लश स्नुकर पार्लर, क्रिकेट टर्फ, पत्र्याच्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यानुसार मीरा-भाईंदर महानगरपालीका मलनिस्सारण विभाग, पेणकरपाडा येथील सर्व्हे क्रमांक नवीन 49, 50, 67, 75, 76, 77, 240, 64 या जागेच्या मालकासह बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदळवन उपसमितीचा अहवाल

ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते धीरज परब यांनी तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली होती. दरम्यान अप्पर तहसीलदार नीलेश गौंड यांनी दिलेल्या आदेशानुसार वनविभागासह महसूल विभागाने 31 मे 2024 रोजी या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बेकायदा बांधकाम, माती व डेब्रिजचा भराव तसेच महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाची झोपडी आढळून आली. या बेकायदा बांधकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचेदेखील कांदळवन उपसमितीच्या अहवालात समोर आले.