22 वेळा हरलेला चहावाला तेवीसाव्या वेळी लढणार निवडणुका

सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात अनेकवेळा देशवासियांचे आभार मानताना जनतेने एक चहावाल्याला डोक्यावर बसवलं असं म्हणतात. यामुळे चहावाला हा शव्द खूप चर्चिला जातो. पण तुम्हांला ऐकून गंमत वाटेल की मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पण एक चहावाला असून त्याने आतापर्यंत 22 निवडणूका लढवल्या असून या लोकसभेत तो 23 व्या वेळा निवडणूक लढणार आहे. आनंद सिंह कुशवाहा (49) असे त्याचे नाव आहे. यावेळी ग्वाल्हेरमधून तो लोकसभा निवडणूक लढणार आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत लढलेल्या 22 ही निवडणूकांमध्ये आनंद यांचा पराभव झाला आहे. पण तरीही या लोकसभेत ते नव्या उमेदीने 23 व्या वेळी लढणार आहेत. आतापर्यंत अनेकवेळा त्यांचे डिपॉझीटही जप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला आहे. पण एवढे असूनही आनंद यांचा निवडणूक लढवण्याचा उत्साह मात्र कायम आहे.

आनंद सिंह 1994 पासून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या या निवडणूक लढवण्याच्या छंदाबद्दल त्यांना विचारले असता लोकांना वेगवेगळे शौक असतात. तशी मला निवडणूक लढवण्याची हौस आहे. लोकशाहीचा एक भाग बनण्याची माझी इच्छा आहे. या देशाचा सजग नागरिक होण्याच्या नात्याने निवडणूक लढवणे हा माझा अधिकार असल्याचे आनंद यांनी म्हटले आहे. आनंद यांनी नगरपलिका निवडणूकांपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणूका लढवल्या आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रपती निवडणुकांसाठीही त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला होता.