उमेदवाराने पैसे न दिल्याने रोजंदारी महिलांमध्ये हाणामारी

भाजपा आणि शिंदे गटात अन्य पक्षातील कार्यकर्ते व माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याची स्पर्धा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र सत्ताधाऱ्यांना महापालिका निवडणुकीत मनुष्यबळाची प्रचंड कमतरता जाणवत आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गंगापूर रोड भागात जाणाऱ्या महिलांना जास्त पैशांचे आमिष दाखवून सिडकोतील एका उमेदवाराच्या एजंटाने दिवसभर थांबवून ठेवले. उमेदवाराने मोबाईल स्विचऑफ केला, यामुळे पैसेच न मिळाल्याने  तक्रार देण्यासाठी गेलेल्या संतप्त महिलांमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार हाणामारी झाली. नाशिक शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना या दोन्हीही पक्षांना प्रत्यक्षात प्रचारासाठी कार्यकर्तेच मिळेनासे झाले आहेत. यामुळे रोजंदारी महिला व कार्यकर्ते आणले जात आहेत. मंगळवारी गंगापूर रोड भागातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी 65 महिला निघाल्या. सिडकोतील पंडितनगर भागातील एका एजंटने त्यांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचाराला जाण्यासाठी जास्त पैशांचे आमिष दाखवले आणि थांबवून ठेवले. सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या महिला थांबल्या, त्यांना साधा नाष्टाही दिला नाही. उमेदवाराकडूनही कोणी संपर्प केला नाही. महिलांनी एजंटकडे पैशांसाठी तगादा सुरू केला. शेवटी प्रचार नाही तर पैसे कसले देणार, असे सांगून या एजंटने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिलांनी मध्यस्थी महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली.