धारावीच्या पुनर्विकासासंदर्भात जोपर्यंत प्रशासनाबरोबर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघत नाही आणि धारावीकरांना सरसकट 500 चौरस फुटांच्या घरासह आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वेक्षण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आज सकाळी धारावीतील नाईकनगर झोपडपट्टीत सर्वेक्षणासाठी घुसलेल्या अदानीच्या डीआरपीपीएल पंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारावीकरांनी हुसकावून लावले. दरम्यान, डीआरपीपीएल पंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय सर्वेक्षण करू देणार नाही, असेही धारावी बचाव आंदोलनाच्या सदस्यांनी स्पष्ट केले.
राज्यातल्या मिंधे सरकारने नियम डावलून धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंपनीला दिल्यामुळे धारावीकरांमध्ये प्रचंड संताप असून अदानीकडून धारावीचा पुनर्विकास करण्याला विरोध आहे. त्यात आता अदानीच्या ‘डीआरपीपीएल’ पंपनीकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, याला धारावीकर कडाडून विरोध करत आहेत. सोमवारी आणि आजही सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न डीआरपीपीएलकडून करण्यात आला. मात्र, धारावीकरांनी एकजुटीने विरोध करत हे सर्वेक्षण उधळून लावले. यावेळी शिवसेना दक्षिण मध्य लोकसभा निरीक्षक आणि माजी आमदार बाबूराव माने, धारावी बचाव आंदोलन समितीचे समन्वयक अॅड. राजेंद्र कोरडे, समितीचे सदस्य सतीश कटके, जगन्नाथ खाडे, शाखाप्रमुख किरण काळे, श्यामलाल जैसवाल, मंगल खांडेकर, अशफाक खान, साम्या कोरडे, उल्लेश गजाकोश यांच्यासह कार्यकर्ते आणि धारावीकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सर्वेक्षण नंबरला काळे फासले
रविवारी आणि आज सकाळी नाईकनगरमध्ये केलेल्या काही सर्वेक्षणानंतर झोपडीधारकांच्या झोपडय़ांवर सर्वेक्षण नंबर टाकण्यात आले होते. या नंबरला झोपडीधारकांनी नंतर डांबर फासले. अदानी आणि अदानीच्या पंपनीबद्दलचा राग धारावीकरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळाला.
धारावीकरांना कमी लेखू नका!
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना प्रशासनाने खबरदारी बाळगावी, कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून धारावीकरांनी आपला राग दाखवून दिला आहे. त्यामुळे या पुढेही सरकारने धारावीकरांना कमी लेखू नये, असा इशारा माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला आहे.
खासदार अनिल देसाई, वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘डीआरपी’ कार्यालयात शुक्रवारी बैठक
धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयातील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्थानिक खासदार अनिल देसाई आणि उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह धारावी बचाव आंदोलन समन्वय समितीचे सदस्य, धारावीकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी धारावीबद्दलच्या सर्व मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.