सिनेविश्व – साडी संस्कृतीचा प्रवास

>>दिलीप ठाकूर

जगभरात आपल्या देशाचे राष्ट्रीय वस्र म्हणून साडी ओळखली जाते. आपल्या देशातील ही दीर्घकालीन परंपरा, साडी संस्कृतीचा प्रवास ‘मेरी साडी मेरी सखी’ लघुपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे.

दृश्य माध्यमातून बरेच काही दाखवता येते, सांगता येते. चित्रपट तर झालेच, पण लघुपट आणि माहितीपट यांचे विश्वही आता चौफेर विस्तारले असून त्यात अनेक छोटय़ा-छोटय़ा पण चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रभावित करणाऱया अशा लघुपटातल्या अनेक गोष्टींशी प्रेक्षक सहजपणे जोडला जातो.

साडी ही हिंदुस्थानी स्रीच्या पोशाखाची ओळख आहे आणि प्रत्येक स्रीच्या साडीच्या स्वतःच्या अशा आठवणी असतात किंवा असू शकतात. वयात येताना पहिल्यांदा नेसलेल्या साडीपासून त्या सुरू होतात. साडी आणि तिच्या भोवती असणाऱ्या अनेक गोष्टींशी सहजपणे जोडणारा विषय.

गोल्डन मेलडीजच्या मिहीर उपाध्यक्ष दिग्दर्शित ‘मेरी साडी मेरी सखी’ हा लघुपटही असाच लक्षवेधक आहे. अरुण गौरीसरीया यांच्या कवितेवर आधारित हा लघुपट असून शेफाली शहाचे अतिशय नेमक्या शब्दांत प्रभावी निवेदन याला लाभले आहे. आपल्या देशातील विविध राज्यांतील मोठ्या शहरापासून खेडय़ापाडय़ापर्यंत आणि सर्व सामाजिक स्तरांतील साडीची संस्कृती, परंपरा, वैशिष्टय़े अतिशय ओघवत्या शैलीत यात दाखवली आहेत. आपण ही सगळी माहिती दृश्य माध्यमात पाहताना अचंबित होतो. दिग्दर्शकाने कसा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा तपशीलवार विचार करून हे सगळेच मांडले आहे याचे आपल्याला कुतूहल व कौतुक वाटत राहते. त्याची चौफेर दृष्टी पडद्यावर दिसून येते.

विविध भागांतील सणानिमित्त नेसली जाणारी साडी, तसेच नोकरदार महिलेची साडी, ग्रामीण भागातील साडी, कॉर्पोरेट क्षेत्रातील साडी, त्यातच सहावारी, नऊवारी, पैठणी, कांजीवरम असे साडय़ांचे अनेक प्रकार. दक्षिणेकडील राज्यातील साडी संस्कृती वेगळी, पश्चिम बंगालमधील वेगळी, शहरी कामगार वर्गातील साडी वेगळी, कष्टकरी स्रीची वेगळी, तसेच आदिवासी भागातील साडी वेगळी. डोक्यावरचा पदर वेगळा आणि पदराखाली तान्हुल्यास घेणे वेगळे. नवरात्रोत्सवातील नऊ रंगांतील साडय़ांचे वैशिष्टय़. विविध देविकांना देवळात नेसवली जाणारी साडी… साडीबद्दल अनेक महिलांच्या अनेक प्रकारच्या आठवणी, आवडीनिवडी वेगळ्या. हे सगळेच भरभर आपल्या डोळ्यांसमोर येत जाते. भेटवस्तू म्हणून साडी देणे वा घेणे आणि विशेष सोहळ्यातील साडी अशा असंख्य गोष्टी हा लघुपट दाखवतो. एक प्रकारचा हा साडी संस्कृतीचा प्रवास आहे आणि ही साडी महिलांना ‘माझी सखी’ का वाटते? साडीच्या निवडीबद्दल खरेदी करताना त्या कमालीच्या जागरूक का असतात? या सगळ्यांची कळत-नकळत उत्तर मिळत जातात. याच साडीचा पदराचा अनेक प्रसंगांत केलेला वापर आणि मानाचा पुरस्कार सोहळ्यात खास साडीतच जाण्याची मानसिकता हेही यात दिसते.

जगभरात आपल्या देशाचे राष्ट्रीय वस्र म्हणून साडी ओळखली जाते. आपल्या देशातील ही दीर्घकालीन परंपरा आहे. दिग्दर्शक मिहीर उपाध्यक्ष यांनी ‘द ब्लाइंड डेट’, ‘टेक अवे’, ‘गुड नाइट स्लीप टाइट’ इत्यादी अनेक लघुपट निर्माण केले असून विविध देशांतील चित्रपट महोत्सवात ते दाखवले गेले आहेत. त्यातल्या काहींनी पुरस्कारही प्राप्त केले आहेत. त्यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढला आणि ‘साडी’ या आदरयुक्त वस्त्राविशेष लघुपटाकडून पुढे त्याचा प्रवास सुरू आहे. लघुपटदेखील माहिती देत मनोरंजन करतात हे या लघुपटाने अधोरेखित केले आहे. ‘मेरी साडी मेरी सखी’ याच नावाने यूटय़ूबवर पाहता येईल.

[email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)