
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 44 वर्षीय महिलेचा आजारामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे आईच्या मृत्यूनंतर 14 वर्षाचा मुलगा चार दिवस मृतदेहासोबत एकटा घरी राहिला. घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्माक मृत्यूची नोंद केली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये सिल्विया डेनियल ही महिला आपला मुलगा ऑल्विन डेनियलसोबत राहत होती. या महिलेचा आजारामुळे मृत्यू झाला. मात्र महिलेच्या मृत्यूला चार दिवस झाले तरी याबाबत कुणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे तिचा 14 वर्षाचा मुलगा चार आईच्या मृतादेहासोबत घरात एकटाच होता.
बुधवारी इमारतीचा वॉचमन आणि शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येऊ लागला. यानंतर शेजाऱ्यांनी डेनियल हिचा दरवाजा ठोठावला. डेनियलच्या मुलाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोरील दृश्य पाहून शेजारी हैराण झाले. घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांनी खडकपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली.
खडकपाडा पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता त्याने आजारपणामुळे आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे.