
बॉलीवूडमध्ये अलीकडे धार्मिक भेदभाव होत असल्याचे वक्तव्य करणाऱया संगीतकार ए. आर. रेहमान याने आता घुमजाव केले आहे. ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणालाही कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे रेहमानने म्हटले आहे.
एका मुलाखतीत रेहमानने बॉलीवूडमधील बदलत्या वातावरणावर भाष्य केले होते. ‘गेल्या काही वर्षांपासून मला बॉलीवूडमध्ये काम मिळत नाही. झालेले कॉण्ट्रक्टही अनेकदा रद्द केले जाते. सर्जनशीलता नसलेल्या लोकांना काम मिळते. यामागे सत्तेतील बदल किंवा धार्मिक बाबीही असू शकतात. मला प्रत्यक्ष कधी याचा अनुभव आला नाही, मात्र तशी पुजबुज ऐकायला मिळते,’ असे तो म्हणाला होता. रेहमान याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीका सुरू झाली होती. अनेक गायक, संगीतकार व कलाकारांनी रेहमान याच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर रेहमान याने आज खुलासा केला.
हिंदुस्थान माझा गुरू
‘माझे म्हणणे नीट समजून घेतले गेलेले नाही. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. वैविध्य आणि रचनात्मक कामाला स्वातंत्र्य देणाऱया वातावरणात काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. माझ्यासाठी संगीत हे लोकांशी आणि संस्पृतींशी जोडून घेण्याचे व सर्वांचा सन्मान करण्याचे माध्यम आहे. हिंदुस्थान हे केवळ माझे घर नाही, तर प्रेरणा आणि गुरू आहे. माझी प्रामाणिक भावना समजून घेतली जाईल,’ अशी अपेक्षाही रेहमान याने व्यक्त केली.
























































