…तर मीसुद्धा बुरखा घातला असता! मुलीच्या बुरखा प्रकरणावर ए. आर.रहमान यांनी मौन सोडले

1459

बुरखा घालणे हा माझ्या मुलीचा स्वतंत्र निर्णय असून हा निर्णय घेण्यापूर्वी आम्हा कुणालाही विचारले नव्हते. पुरुष बुरखा घालत नाहीत, पण संधी मिळाली असती तर मीसुद्धा बुरखा घातला असता, अशा शब्दांत ऑस्कर विजेते संगीतकार-गायक ए. आर. रहमान यांनी मुलीच्या बुरखा प्रकरणावर उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी रहमान यांची मुलगी खतिजा हिचा बुरखा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून ‘खतिजाला बुरख्यात पाहिल्यावर माझा जीव घुसमटतो’ अशी प्रतिक्रिया बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विटद्वारे दिली होती. नेटिझन्सनी देखील रहमान यांच्यावर टीका केली होती. अखेर या वादावर आता रहमान यांनी चुप्पी तोडली आहे. एका मुलाखतीत रहमान म्हणाले, ‘मला संधी मिळाली असती तर मीसुद्धा नक्कीच बुरखा घातला असता. कुठल्याही दुकानात जाऊन मी अगदी मजेत शॉपिंग करू शकलो असतो. खतिजाला देखील कदाचित बुरखा घालण्यात तिचे स्वातंत्र्य जाणवत असावे. मोलकरणीची आई किंवा तिच्या कुटुंबीयांचे निधन झाले तर ती त्यांच्या अंत्यविधीलाही जाते. हा तिच्या स्वभावाचा साधेपणा असून ते पाहून मीसुद्धा आश्चर्यचकित होतो.’

खतिजाने देखील त्यावेळी तस्लिमा यांना या प्रकरणी सडेतोड उत्तर दिले होते. आयुष्यात मी जे निर्णय घेतले आहेत त्यांचा मला अभिमान आहे. माझ्या बुरख्यामुळे तुमचा जीव घुसमटतोय याची मला कीव येते. कृपया तुम्ही जरा बाहेर पडून मोकळी हवा खा अशा शब्दांत तस्लिमा यांचा समाचार घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या