अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी चाललेल्या मित्रांच्या कारला भरधाव कंटेनरने धडक दिल्याची घटना पुण्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कंटेनरने स्विफ्ट कारसह तिघांना जोरदार धडक दिली. यानंतर एका तरुणाला कंटेनरने काही अंतरावर फरफटत नेले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रोहित पोकळे असे मयत तरुणाचे नाव आहे. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पुण्यातील चार मित्र स्विफ्ट कारने अक्कलकोटला देवदर्शनाला चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर वाखरीजवळ त्यांची गाडी गरम झाल्याने रस्त्याच्या कडेला त्यांनी गाडी थांबवली. चौघेही गाडीजवळ उभे होते. याचदरम्यान पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटनरने कारसह तिघांना चिरडले. कंटनेरकडे वेळीच लक्ष गेल्याने एकाने बाजूला उडी घेतली. यामुळे तो बचावला आहे. इतकेच नाही तर एका तरुणाला कंटेनरने फरफटत नेले.
घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मद्यधुंद कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. प्रदीप माने असे आरोपी कंटेनर चालकाचे नाव आहे. यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.