हिमालय पर्वतरांगांमध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करून चीनने अख्खं गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थलांतरित होऊन या गावात स्थायिक होण्यासाठी कुटुंबांना पैसे देण्यात आले असून रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनच्या घुसखोरीचा नवा कारनामा समोर आला असताना त्याचा कोणताच मागमूस केंद्रातील मोदी सरकारला नाही. त्यामुळे हिंदुस्थान-चीन सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हिंदुस्थानसह अनेक देशांबरोबर सामाईक सीमा असणाऱ्या चीनने अतिक्रमणाची आगळीक सुरूच ठेवली आहे. अरुणाचल प्रदेशात हिंदुस्थानच्या सीमाभागातच हे संपूर्ण गाव वसवले गेले आहे. सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने डोकलाम भागातही याआधी गाव उभारले असून तिथे माजी सैनिकांना घरे दिली आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सने विविध देशांसमवेत असलेल्या चीनच्या 22 हजार किमी लांब सीमेवरील गेल्या पाच वर्षांतील वस्त्यांचा उपग्रहांद्वारे मॅपिंग आणि विश्लेषण केले असता चीनची घुसखोरी उघडकीस आली आहे. यात चीनच्या उत्तरेकडील मंगोलियापासून मध्य आशियापर्यंत, हिंदुस्थानबरोबर असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ते दक्षिणेकडील व्हिएतनामपर्यंत चीनच्या या वसाहती आढळून आल्या आहेत.
डोकलामजवळ उभारली युद्धसज्ज गावे
भूतान सीमेवर असलेल्या चीनच्या 11 गावांपैकी काही डोकलाम क्षेत्राजवळ आहेत. 2017 मध्ये उभय देशांमध्ये संघर्ष झालेल्या डोकलाम आणि अन्य वादग्रस्त ठिकाणांपासून अवघ्या तीन ते नऊ मैलांच्या परिघात ही गावे आहेत. दोन्ही देशांचा फौजफाटा वादग्रस्त ठिकाणी तैनात असताना चीनने माजी सैनिकांनाही या गावांत आणून ठेवले आहे. याशिवाय पक्के डांबरी रस्ते, लष्करी ट्रक, डिश अँटेना अशा सुविधाही या गावांत आहेत. युद्धासाठी तयार अशा या गावांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सीमारक्षकांची गावे असे संबोधले आहे.
तिबेट, भूतान, नेपाळमध्येही घुसखोरी
हिंदुस्थानी सीमेला लागून तसेच भूतान आणि नेपाळच्या सीमेला लागून आणि काही ठिकाणी तर या सीमाभागात अतिक्रमण करत चीनने काही गावे उभारली आहेत. एकाच डिझाइनची घरे असणाऱ्या या नागरी वसाहतींमुळे सीमेवर वेगाने लष्कर पाठवणे आणि या दुर्गम भागांतील शेजारी देशाच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवून खबरबात पुरवणे असे चीनचे दुहेरी उद्देश पूर्ण झाले आहेत.
चीनच्या गावांची ग्रेट वॉल
चीनने अलिकडच्या वर्षांत आपल्या पश्चिम सीमेवर अशी 50 हून अधिक नवीन गावे बांधली आहेत. त्यापैकी 12 गावे इतर देशांनी दावा केलेल्या भागात असल्याचे उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण केल्यावर आढळून आले आहे. म्यानमार, ताजिकिस्तान, व्हिएतनाम या देशांच्या सीमेवरही चीनची ही गावे उगवली आहेत. वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात हातपाय पसरणाऱ्या चीनने या देशांशी असलेल्या भूसीमेवरही तेच धोरण अवलंबले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्या आठ वर्षांत चीनने आपल्या सीमेचा अनधिकृत विस्तार चालवला आहे.
गस्तीसाठी दरमहा 21 हजार रुपये
सरासरी 10 हजार फूट उंचीवर वसलेल्या या गावांतील लोकांना गस्तीसाठी चीन सरकार दरमहा 21 हजार रुपये देत आहे. येथे स्थायिक होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला अंदाजे अडीच लाख रुपये आणि प्रवासासाठी याक प्राणी दिले जात आहेत.
किओंगलिन न्यू व्हिलेज
आजवर गुरेचराई आणि मेंढपाळ, शिकाऱ्यांचा वावर असलेल्या हिमालयातील पठारी प्रदेशात चिनी अधिकाऱ्यांनी हे ’किओंगलिन न्यू व्हिलेज’ उभारले आहे. लोकांना येथे येऊन राहाण्यासाठी पैसे, रोजगार आणि इतर प्रलोभने दाखवली गेली होती. अशी अनेक गावे हिंदुस्थानच्या हद्दीत चीनने वसवली असली तरी हिंदुस्थानने राजनैतिक वा अन्य कुठल्याही माध्यमातून याविषयी अवाक्षरही उच्चारलेले नाही.
सीमेवर विशेषतः हिंदुस्थानमध्ये शिरकाव करणे शक्य आहे अशा प्रत्येक हिमालयीन खिंडीत मोक्याच्या ठिकाणी चीनने ही गावे वसवली आहेत.
हिंदुस्थानसह नेपाळ, भूतान, म्यानमार यासह एकूण 9 देशांचा सीमाभाग बळकावणाऱ्या चीनने अशी 170 गावे वसवली आहेत. युद्धसज्ज सुविधांसह ही गावे वसवली जात असताना हा भाग जणू चीनला आंदण देऊन टाकल्यागत मोदी सरकारने डोळ्यांना झापड लावले आहे.
हिमालयात नव्याने वसवलेल्या गावात जे लोक चीन सरकारची ऑफर स्वीकारून स्थलांतरित झालेत त्यांचा ‘सीमेचे पालक’ असा गौरव चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग करत आहेत.