
परदेशातून लस खरेदी करता आली तर केवळ तीन आठवड्यात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करू, असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. हे लसीकरण कसे करायचे त्याचा रोडमॅप तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. मुंबईतील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली. त्यानंतर जागतिक पातळीवरून लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत लसीकरण केंद्रे वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले. प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र व प्रत्येक महापालिका झोनमध्ये एक ‘ड्राइव्ह-इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी झाल्याने शहरात लसीकरण केंद्रे वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर शहरांमध्येही ‘ड्राइव्ह-इन’ लसीकरण राबवा
‘ड्राइव्ह-इन’ लसीकरण मोहिमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरीत्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे सांगतानाच राज्यातील इतर शहरांमध्येही, अशी लसीकरण मोहीम घेण्यात यावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
नागरिकांना सध्या कोविन मोबाईल ऍपवर नोंदणी करावी लागते. परंतु बऱयाच नागरिकांना त्या तंत्रज्ञानाची माहिती नाही किंवा ऍप हाताळता येत नाही. अशा नागरिकांनाही सुलभरीत्या लस मिळावी यासाठी एक पद्धती तयार करण्यावरही काम सुरू आहे.





























































