मिंधेंनी आगामी निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि शिवसेना हे नाव वापरू नये असे आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. तसेच नवी मुंबई विमानतळावर मिंधे आणि भाजपने हवाई दलाला स्टंटबाजी करायला लावली असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
आज आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीत पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, मिंधे सरकारचे घोटाळे आम्ही समोर आणत आहोत. कालची कॅबिनेटची बैठक धक्कादायक होती. त्यात 80 निर्णय झाले. गेल्या दोन वर्षात हे निर्णय का नाही घेतले गेले हा प्रश्न उपस्थित होतोय. अदानींना महाराष्ट्रात देण्यासाठी, अदानींची भुक संपवल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. तोवर कॅबिनेटच्या बैठका सुरू राहतील. कालच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार 10-15 मिनिटात बाहेर पडले होते. नगर विकास आणि MMRDA खाती ही सध्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्या खात्यातील मुंबई, पुणे, नाशिक महापालिकेत अनेक घोटाळे झाले आणि ते आम्ही समोर आणले होते. हे मुख्यमंत्री जनतेसाठी बिनकामाचे आणि कंत्राटदारांसाठी कामाचे आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गायमुख ते भाईंदर रस्ता 14 हजार कोटी आणि 16 हजार कोटींचे दोन पॅकेजेस होते. त्यात बोगदा आणि एलेव्हेटड रोडचा समावेश होता. या 16 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला आम्ही विरोध केला होता. कारण अवघ्या 20 दिवसांत एका कंत्राटदारासाठी काढण्यात आलं होतं. कोर्टामुळे ही लूट थांबली म्हणून त्यांचे मी आभार मानतो. कोर्टाने असा निर्णय दिला की या टेंडरला 20 नव्हे तर 60 दिवस मिळणार आहेत. हे टेंडर कुणालाही मिळो पण यात जी पद्धतशीर गोष्ट होत होती, रीतसर यात गोष्टी झाल्या पाहिजेत. टेंडरमध्ये कुठलीही अनियमितता असता कामा नये. आणि घोटाळा तर नकोच. गेल्या दोन वर्षात अनियमितता आणि घोटाळे तर आहेच. MMRDA अधिकाऱ्यांनाही मी सांगितलं आहे की याची आम्ही चौकशी करणार आहोत. यात बँक गॅरंटी घेतली आहे की जनेतेचे त्यात 1600 कोटी रुपये लागले आहेत. ती बँक सेंट लुशिया मधली बँक आहे. आमचं सरकार येत आहे आणि आम्ही त्याची चौकशी करू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
जनतेच्या पैश्याची चर्चा करायची असेल तर आज घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी नवी मुंबईत एक स्टंट केला आहे. एअरफोर्सच्या विमानाचे या रनवे वर लॅण्डिंग केले आहे. या सी 2 विमानाची खासियत पाहा. नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू आहे. त्याच्या नावाचा प्रस्ताव आम्ही दिला होता. दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला नाव दिले पाहिजे असा आमचा प्रस्ताव होता. पण केंद्र सरकारने महाराष्ट्राचा द्वेष म्हणून त्या नावाला मान्यता दिलेली नाही. निवडणुकीच्या आधी काही तरी थातुर मातुर काही तरी सांगतात. पण ज्या प्रमाणे अदानीसाठी दिवस रात्र काही कॅबिनेट बैठका घेतल्या. तशा या नावासाठी का नाही घेतल्या.
जनतेचे पैसे घेऊन, विमानतळावर असे स्टंट करायची काय गरज होती? हे वायुदलाचे एअरपोर्ट नाहीये. हे नागरी विमानतळ असून जोपर्यंत सर्व मान्यता मिळत नाही तोवर हे विमानतळ असूच शकत नाही. स्टंट करण्यासाठी नितीन गडकरींनी हवाई दलाची विमानं टोल असलेल्या रस्त्यावर उतरवली आहेत. एखादं विमान तुम्ही सी लिंकवरही उतरवाल. सी लिंक काही एअरपोर्ट नाही. आणि एअरपोर्ट तयार असतं तर आज त्याचं उद्घाटन करायला हवं होतं.
छेडा नगर चा फ्लायओव्हर दोन आठवडे झाले तयार आहे तरी त्याचे उद्घाटन झालेले नाही. तसे आज या विमानतळाचे उद्घाटन का नाही झाले. गॉगल घालून टॉपगन सारखे फोटो काढण्यासाठी सुरू आहे. ही स्टंटबाजी बंद करा, आणि नवी मुंबई विमानतळला दि.बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्राकडून 24 तासात मान्य करून घ्या.
मार्च 2020 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नाव दिले होते. पण महाराष्ट्र आणि संभाजीनगरचा द्वेष म्हणून अजूनही ते नामकरण झालेले नाही. म्हणजे एका बाजूला सांगायचं की आम्ही व्यक्तींच्या नावांनी आम्ही नावं देऊ शकत नाहीत. दुसऱ्या बाजूला मोप्यामध्ये मनोहर पर्रिकर यांचे नाव विमानतळाला दिलेले आहे. अयोध्येत विमानतळाला महर्षि वाल्मिकी यांचे नाव दिले आहे. मग महाराष्ट्राच्या बाबतीच हा अन्याय का? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढा द्वेष का, दि.बा. पाटील यांच्याबद्दल एवढा द्वेष का? एकनाथ शिंदे आणि भाजप हे महाराष्ट्राचा द्वेष करतात आणि लुटतात हे जनते समोर आलेलं आहे. वेगवेगळ्या समाजाला आपल्या बाजूला करण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलली होती. आजही या रेल्वे स्थानकांचं नाव बदलेले नाही. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून काही काम होत नाही पण किमान नामकरण तरी बदला. हे रील मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून काही काम होत नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या एका गद्दार आमदाराने म्हटलं होतं की अदानींना जी मुलुंड आणि कुर्ल्यात जी जागा दिली होती ती रद्द करण्यात आली आहे. ती रद्द केलीच नाही, खोटं बोलले ते. मुंबईतली दीड हजार एकर जमीन फुकट एका खासगी माणसाला देत आहेत हे कसं काय चालेल?
भाजपने वायुदलाची माफी मागावी. कारण भाजपने अनेकवेळेला वायुदलाला अशा स्टंटबाजीमध्ये खेचलेलं आहे. मग ते गडकरींच्या टोल नाक्यावरचं असो किंवा आज नवी मुंबई विमानतळावर उतरलेलं विमान असो. ही धावपट्टी एवढी तयार असेल तर त्या विमानतळाचंच उद्घाटन करायला हवं होतं. वर्षअखेर हे विमानतळ सुरूही होईल. पण निवडणुकीच्या तोंडावर असे वायुसेनेचे विमान आणणे चुकीचे आहे.
जातीपातीत वाद लावण्याचे शिंदे आणि भाजपचं काम आहे. ओबीसी प्रवर्गात काही जातींचा समावेश करण्यात आला. मग हा निर्णय आधी का नाही झाला? काल कॅबिनेच्या बैठकीत 80 प्रस्ताव पारित करण्यात आले. त्यापैकी किती स्वतःसाठी होते किती कंत्राटदारांसाठी होते?
गेल्या दोन अडीच वर्षात शिंदे आणि भाजपने महाराष्ट्राला लुटलं आहे, राज्यावर अत्याचार केला आहे. त्यामुळे कुठलाही मतदार शिंदे असो वा भाजपला मत देणार नाही.
एकनाथ शिंदे जे करतात आणि बोलतता त्यांच्यावरून त्यांचे संस्कार दिसतात. एवढीच जर हिंमत असेल तर या निवडणुकीत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, शिवसेनेचा नाव आणि धनुष्यबाण वापरू नये. स्वतःचा चेहरा घेऊन जनतेमध्ये जावे असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.