प्रदूषण रोखण्यासाठी खासगी बांधकामांना एक आठवडा स्थगिती द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सर्दी-खोकला व अन्य आजारांची लागण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक असताना सरकार आणि मुंबई महानगरपालिका पावले उचलत नाही, असा आरोप करतानाच, मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी खासगी बांधकामांना एक आठवडा स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली.

आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबईतील प्रदूषणाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता केवळ मुंबईकरांनी केवळ मास्क लावून उपयोग नाही. परदेशी व्हीआयपी मास्क लावून मुंबईत आले तरच सरकार आणि महानगरपालिका पावले उचलते. व्हीआयपी आले की ट्रफिक सुधारते, रस्त्यांची रंगरंगोटी होते, हवा सुधारते, प्रदूषण कमी होते, एक्यूआय सुधारतो. मग सामान्य मुंबईकरांसाठी अशा उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी शहरांमधील खासगी कन्स्ट्रक्शनना एक आठवडा स्थगिती दिली पाहिजे. बांधकामांसाठी वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे. कोणत्या वॉर्डमध्ये कधी काम करावे याच्या वेळा ठरवल्या पाहिजेत, अशी सूचनाही आदित्य ठाकरे यांनी केली.