
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज-1 अंतर्गत तयार झालेल्या 556 घरांचा लाभार्थ्यांना ताबा मिळावा यासाठी येत्या आठवडाभरात चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डी’ आणि ‘ई’ या दोन इमारतींना ओसी मिळाली असून नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे रहिवासी डोळे लावून बसले आहेत. रहिवाशांना लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटलेय, ‘फेज-1 अंतर्गत 556 घरे पूर्णतः तयार झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज आहेत. लाभार्थ्यांना लवकरात लवकर चाव्यांचे वितरण झाले पाहिजे, जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील.’
लाभार्थी अजून किती दिवस भाडय़ाच्या घरात राहणार?
इमारत तयार असूनही हे लाभार्थी अजून किती दिवस भाडय़ाच्या घरात किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत नवीन घरे वितरित झाल्यानंतर ट्रान्झिट कॅम्प रिकामे होतील. त्यामुळे पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास चालना मिळेल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.