‘EVM – निवडणूक आयोगाने बहुमत दिल्यानंतर लगेच कामाला लागायला हवं होतं’, आदित्य ठाकरे यांचा टोला

ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने इतकं बहुमत दिल्यानंतर महायुतीने लगेच कामाला लागायला हवं होतं, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ”काही लोक जॅकेट शिवून असतात, मंत्रिपद मिळावं म्हणून प्रार्थना करत असतात. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असू शकते. सरकार ईव्हीएमने निवडल्यानंतर, सरकार स्थापनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यानंतरही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या पहिल्या शपथविधीला खूप वेळ लागला. यानंतर यांच्यात जी भांडणं आणि जो स्वार्थीपणा सुरू आहे, हे बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला हवी होती.”

फडणवीस सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, ”ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने इतकं बहुमत दिल्यानंतर महायुतीने लगेच कामाला लागायला हवं होतं. मात्र मला काय मिळणार, तुला काय मिळणार, यांचा हा स्वार्थी आणि हावरटपणा लोकांसमोर आला आहे. बहुमत मिळूनही हे खुश नाही आहे. कुठेही आनंद साजरा केला नाही, व्यक्त केला नाही. यांचा पुढचा विचार काय तर मंत्रिपद कोणतं मिळणार, कुठलं खातं मिळणार, त्यातून खायला काय मिळणार? गद्दार गॅंगमधून हे जे विचार आले आहेत, ते भयानक आहे. महाराष्ट्राचे चित्र कधीही असं नव्हतं आणि नसावं, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना असेल.”

यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”जर भाजप सरकारची रस्ते घोटाळ्यावर खरोखरच कारवाई करण्याची इच्छा असेल, तर त्यांना त्या वेळचे घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या कार्यकाळातील दोन पालकमंत्री – लोढा आणि केसरकर यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवावे लागेल, यानंतरच निष्पक्षपाती चौकशी होऊ शकते.”