अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. खरीपाच्या पिकांचा चिखल झाला असून फळबागांचीही नासाडी झाली असताना सरकारकडून नेहमीप्रमाणे पंचनाम्यांचे नाटक सुरू आहे. त्यामुळे शेतकरी देशाधडीला लागला असताना नुसते पंचनामे काय करता? शेतकऱ्यांना आधी मदत करा, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला खडसावले. आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी थेट बांधावर जाऊन केली.
गेल्या आठवड्यात मराठवाड्यावर आभाळच फाटले. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा जबर तडाखा बसला. पावसाचा जोर एवढा होता की गुडघाभर वाढलेला कापूस मुळासकट उखडला गेला. शेतातून नद्या वाहिल्या. सोयाबीन, मूग, उडीद, मका, तुरीचा अक्षरशः चिखल झाला. फळबागांचे तलाव झाले. मराठवाड्यात जवळपास 12 लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले.
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मराठवाड्याचा झंझावाती दौरा केला. या वेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन लाखे-पाटील आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचोड, जालना जिल्ह्यात बदनापूर, अंबड तसेच पांगरी येथे परभणीत बोरगव्हाण आणि वझूर येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला आणि या संकटात शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली.
आरोप करणे बंद करतो, अगोदर मदत करा
विरोधक केवळ आरोप करण्याचे काम करतात, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्यावर पलटवार करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मी आरोप करणे बंद करतो, अगोदर शेतकऱ्यांना मदत करा, असे आव्हान दिले. राज्यात शेतकरीद्वेष्टे, महाराष्ट्रद्वेष्टे सरकार आहे. हे सरकार अगोदर घालवायचे आहे, असेही आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
व्यथा सांगताना शेतकऱ्यांना रडू कोसळले
मंठा तालुक्यातील पांगरी येथे पावसाने धुमशान केले. घरात पाणी घुसल्याने अन्नधान्य भिजले. संसार उघड्यावर आले. शिवाराचीही पावसाने दैना केली. बहरलेल्या मोसंबीच्या बागा पावसाने उद्ध्वस्त केल्या. पावसाने नुकसान झालेल्या मोसंब्या दाखवताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत अगोदर निवाऱ्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.