वोटचोर, नोटचोर, क्रेडीटचोर यांना रोखण्याची गरज, आदित्य ठाकरे यांचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजप-मिंधेंवर घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून मिंध्यांवर निशाणा साधला आहे. तिजोरी आता राहिलेलीच नाही, तिजोरी साफ झाली आहे. भ्रष्टाचारामुळे मुंबई महापालिकेवर अडीच लाख कोटींचे कर्ज झाले आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. वोटचोर, नोटचोर जब साथ मे आते है तो क्या होता है अॅनाकोंडा, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. वोटचोर, नोटचोर, क्रेडीटचोर यांना रोखण्याची गरज आहे, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला.

आता आपण पुढचे १५ दिवस २० दिवस तसं पाहिलं तर आतापासून १ महिन्यावर आपला विजय दिवस आहे, असे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हणताच संपूर्ण एनएसएआय डोम टाळ्यांच्या कडकडाटांनी दाणाणून उठले. गेले २५ वर्षे आपण जे मुंबईमध्ये काम करून दाखवलेलं आहे ते तुम्हाला घरोघरी न्यायला लागणार, मनोमनी बसवावं लागणार, प्रत्येकाला सांगावं लागणार, पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागणार की आपण काय काम केलेलं आहे. आणि जे काम केलेलं आहे आपण ते अभिमानाने सांगायचं आपण म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलावलेलं आहे, असे आदित्य ठाकरे मुंबईतील आयोजित या पदाधिकारी मेळाव्यात म्हणाले.

कदाचित नुसतं मुंबईतलं नाही, नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर संपूर्ण देशातलं पहिलं फिल्ड हॉस्पिटल उद्धवसाहेबांच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं, तेच हे डोम आहे इथूनच आपण जीव वाचवायला सुरुवात केली होती, असे वरळी डोमचा कोविड काळातील फोटो दाखवत आदित्य ठाकरे म्हणाले. कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग लावले नाहीत. ऐतिहासिक जीव वाचवले आणि ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं. आपण काय केलं काम केलं. लोकांचे जीव वाचवले. जम्बो कोविड केअर असेल आयसीयू असतील, लसीकरण केलं. कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बीकेसीमध्ये जी आता जागा फुकटात अहमदाबादला जायला बुलेट ट्रेनला दिलीय. त्याच जागी उद्धवसाहेबांनी फिल्ड हॉस्पिटल १ आणि फिल्ड हॉस्पिटल दोन आणि मग दहिसर, मुलुंड, भांडूपमध्ये फिल्ड हॉस्पिटल उभारली. त्यावेळी जी माध्यमं उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला. तिथून जी फेसबुक लाइव्हला सुरुवात झाली आणि तेच फेसबुक लाइव्ह मग इतर सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली. इतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी वापरायला सुरुवात केली. पण ती सुरुवात देखील उद्धवसाहेबांनी केली. आणि आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संघटनेनं केलं. त्याच्या मागे एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

१९९७ पासून ते २०२२ पर्यंतची मुंबई महापालिकेची आर्थिक चढ यावेळी आदित्य ठाकरे यांनी ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवली. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवी होत्या. आपण आर्थिक नियोजन जे केलं होतं, कुठेही आपलं काम थांबवलं नव्हतं, कुठेही मुंबईकरांवर कर वाढवला नव्हता. कुठेही पैसे लुटले नाहीत. ९२ हजार कोटींचा प्रत्येक रुपया आपण जे प्रोजेक्ट आपण सुरू करणार होतो, त्या प्रोजेक्टमध्ये दाखवत आलो. प्लॅनिंग करत करत पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण ९२ हजार कोटींपर्यंत गेलो. पण २०२२ ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले. आपल्या तिजोरीवर डोळा होता, अॅनाकोंडाला सोबत घेऊन व्होटचोर, नोटचोर जब साथ मे आते है तो क्या होता है, अॅनाकोंडा…, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तिजोरी आता राहिलेलीच नाही, तिजोरी साफ झाली आहे. दुर्दैवाने जेवढे यांनी भ्रष्टाचार, घोटाळे केलेत गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये त्याचा परिणाम रस्ते तर कुठेच दर्जेदार नाहीत. काही काम झालेलं नाहीये. पण मुंबईचं आता देणं लागतो ते अडीच लाख कोटींवर पोहोचलेलं आहे. हे फक्त महानगरपालिकेचं देणं नाही हे सगळं आपल्या डोक्यावर येतं कारण आपण करदाते आहोत. आपण मुंबईकर आहोत, आपल्या डोक्यावर एवढं कर्ज चढलेलं आहे, याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.