Operation Sindoor दहशतवादाविरोधात सर्व एकत्र, हा माझा देश आहे – आदित्य ठाकरे

पहलगाम हल्ल्याचा आज हिंदुस्थानच्या संरक्षण दलाने पाकिस्तानवर हल्ले करत ऑपरेशन सिंदूर पार पाडले. या हल्ल्यात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ब्रिफिंग करत ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या ब्रिफिंगनंतर संपूर्ण जगभरात हिंदुस्थानबाबत एक कडक संदेश मिळाला आहे.

या ब्रिफिंगचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील दोन्ही महिला अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. त्याबाबत ट्विट केले आहे. ”दोन निर्भिड महिला ऑफिसर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सिव्हिल सर्व्हिस अधिकारी विक्रम मिसरी यांच्यासोबत आज देशाच्या संरक्षण दलाचे प्रतिनिधित्व केले. या ब्रिफिंगमध्ये त्यांनी हिंदुस्थानने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. या तिघांनाही वेगवेगळ्या विचारसरणीच्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. आम्ही सर्व दहशतवादाविरोधात एक आहोत. हा माझा देश आहे. जय हिंद! वंदे मातरम!”, असे ट्विट केले आहे.