
मुंबईत बाइक टॅक्सीला दिलेल्या परवानगीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. बाइक टॅक्सी असो किंवा सीटीफ्लो सारख्या बसेस असतील या माध्यमातून खासगीकरण करून भाजपचं सरकार आणि एसंशी गटाचं सरकार, जे काही ट्रिपल इंजीनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या सार्वजनिक वाहतूक सेवेला म्हणजे बेस्टला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
बाइक टॅक्सीला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. बाइक टॅक्सी म्हणजे अॅपबेस ओला, उबर सारख्या सेवा तसं तुम्ही मोबाइल फोनवरून कुठेही थांबून या बाइक टॅक्सीवर बसून तुम्हाला हवं तिथे तुम्ही जाऊ शकता. विधिमंडळ अधिवेशन सुरू होतं तेव्हा परिवहन मंत्र्यांनी एक स्टंट केला होता. बाइक टॅक्सींवर धाडी टाकल्या होत्या. एवढा ओपन भ्रष्टाचार सुरू आहे की हसायला येतंय. एका बाइक टॅक्सी कंपनीने प्रो-गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी मोठी स्पॉन्सरशिप दिली. आणि आता गोविंदा होऊन एक महिना झाला नाही, त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन-तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळाले. मुंबईत नवीन काहीतरी येतंय आनंदाची गोष्ट आहे. पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फिन्स्टन पूल बंद करून ठेवलेला आहे. सायन पुलाचं काम झालं नाहीये. टिळक ब्रीजचं काम चालू आहे. ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला आहे. रस्त्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे. या सगळ्यात तुम्ही किती बाइक टॅक्सी रस्त्यावर आणणार? याचे कुठे काही नियम आलेत का? बाइक टॅक्सी म्हणजे एक राइडर आणि एक पॅसेंजर त्याच्या मागे बसणार. आणि जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाइक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार? याचा कुठेही उल्लेख नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाइक टॅक्सी असो किंवा सीटीफ्लो सारख्या बसेस असतील या माध्यमातून खासगीकरण करून भाजपचं सरकार आणि एसंशी गटाचं सरकार, जे काही ट्रिपल इंजीनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या सार्वजनिक वाहतूक सेवेला म्हणजे बेस्टला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
एका बाजूला मोनोरेल काल बंद पडली होती. मेट्रोची जिथे-जिथे उद्घाटनं झाली आहेत तिथे दोन-चार पावसाने कुठे पाणी तुंबलं, कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं २५ वर्षे बीएमसीमध्ये आणि बेस्टमध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्सवर बेस्ट चालायची. पाच रुपयांत पाच किलोमीटर, दहा रुपयांत दहा किलोमीटर, १५ रुपयांत १५ किलोमीटर आणि २० रुपयांत तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होता. पण हीच बेस्ट मारायला भाजपने आणि एसंशी गटाने जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आता पाच किलोमीटरला १० रुपये, २० रुपये हे ५० किलोमीटरसाठी आणि ६० रुपयांत ५० किलोमीटर एवढे भाडे करण्यात आले आहे. आधी हेच म्हणजे तुम्हाला ५० किलोमीटर, २० किलोमीटर जायचं असेल तर २० रुपयांत तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होतात. परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं. आणि या उलट आता तुम्ही बाइक टॅक्सी पाहाल तर दीड किलोमीटरला १५ रुपये द्यावे लागणार आहे. नेमका यात फायदा कोणाचा होतोय? बाइक टॅक्सीवाले कोण असणार, कुठून येणार? जे लोक वापरतील ते सुरक्षित असतील की नाही? महिला-पुरुष दोघांसाठी असेल. पण बाइक्स चालवणाऱ्यांना हेल्मेट कोणते देणार, कोण देणार? नो एन्ट्रीमध्ये बाइक्स घालणार का? त्यांच्यावर निर्बंध काही घालणार आहात का तुम्ही? हा प्रश्न उपस्थित होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे, एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत ते ट्रॅफिकचं असेल, रस्त्यांचं असेल त्याच्यात हे अजून मिरची मसाला टाकत नाहीये ना? आणि दुसरं या कंपन्यांना रॅपिड लायसन्स मिळाले कसे? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. काही कंपन्यांना धाडी टाकण्यात आल्या, नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली, नंतर त्यांना लायसन्स मिळालं. हा एक भ्रष्टाचार आहे. फडणवीससाहेब कुठल्याही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करतच नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन बाइक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये? तुम्हाला वाटत असेल की तरुणांनी भज्यांवरून आता बाइक्सवर यावं. कदाचित ते माध्यम असू शकतं. पण याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसवून किती लाख बाइक टॅक्सी तुम्हाला लागणार आहेत? विरोध करत नाहीये. पण हे करत असताना माझ्या बेस्टला का तुम्ही मदत करत नाहिये. बेस्टला गरज आहे बसेस वाढवण्याची, बेस्टला गरज आहे फंड वाढवण्याची ते तुम्ही का नाही देत? ते सोडून परिवहन मंत्री लागलेत बेस्टचे डेपो विकण्यासाठी. एका बाजूल सिटीफ्लो बसेस लावलेल्या आहेत. त्या तुम्ही बीकेसीमध्ये पाहाल तर भयानक चालतात. हायवेवर चालतात. सगळीकडे गल्ली गल्लीत गेलेत. तुम्ही भाजप सरकार म्हणून बेससमध्ये खासगीकरण आणताय. आणि आता बाइक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बेस्ट संपवण्याचा प्रयत्न करताहेत, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला.
खासगीकरणासाठी किंवा बाइक टॅक्सीसाठी जेवढा तुम्ही पाठपुरावा करताहेत तेवढचं परिवहन खात्याने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बेस्टला मदत द्यावी. बेस्ट पाच रुपयांत पाच किलोमीटर जात होती. पण बाइक टॅक्सी दीड किलोमीटर १५ रुपयांत जाणार आहे. मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाला आहे? कुठल्या निकषावर परवानगी दिलेली आहे? हे जाहीर करावं. धोरण बनवत असताना कुठल्या शहराला ते लागू करताय? जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता. आता पण आपल्या लोकल ट्रेन्समधून जवळपास ६० ते ६५ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात. मुंबई महापालिकेत आमचं २५ वर्षे सरकार होतं, पीक अवरला तेव्हा फ्लॅट फेअरवर केलं होतं. पाच वर्षे तेव्हा त्या फ्लॅट फेअरमुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे बेस्ट बसेसमधून जवळपास ३० ते ३५ लाख लोकं रोज प्रवास करायचे. एवढी संख्या या बाइक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का? मदत तुम्ही कोणाला दिली पाहिजे? प्राधान्य तुम्ही कोणाला दिलं पाहिजे? बसेसला दिलं पाहिजे. बसेसेमध्येही तुम्ही खासगीकर करताय. तिकडे बाइक टॅक्सी आणताय. म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं किंवा बेस्टचं जे काही नेटवर्क असेल ते तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताहेत. आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.