ताडोबातील पर्यावरणविरोधी खाण प्रकल्प रद्द करणार का? आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी अभयारण्यात खाण प्रकल्पाला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प वन्यजीव आणि पर्यावरणविरोधी असल्याचे स्पष्ट मत राज्य वन्यजीव संरक्षक मंडळाने नोंदवत या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. कारण या प्रकल्पाने पर्यावरण आणि व्याघ्र कॉरिडॉरला मोठा धोका निर्माण होणार आहे. तसेच आगामी काळात वाघ आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताडोबातील पर्यावरणविरोधी खाण प्रकल्प रद्द करणार का? असा सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.

राज्य वन्यजीव संरक्षक मंडळाच्या सूचना या प्रकल्पाविरोधात होत्या. आता हा विषय राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यावरणविषयक बाबी तपासूनच याला मान्यता देण्यात यावी, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.

वनमंत्री गणेश नाईक यांनी त्याला उत्तर देताना या प्रकल्पाला अद्याप सरकारने मान्यता दिलेली नसून केंद्र सरकारकडे तो रेफर करण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यानच्या काळात नागपूर खंडपीठाने स्युमोटोद्वारे हा विषय त्यांच्या अखत्यारीत घेतल्याने सर्वच बाबींचा अभ्यास होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.