नवाब मलिक यांच्या अजित पवारांसोबत जाण्याच्या निर्णयला भाजपकडून जाहीर विरोध करण्यात आला होता. तशा प्रकारचे पत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पाठवले होते. भाजपचा विरोध झुगारून देखील नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. गुरुवारी नवाब मलिक यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या फोटोसोबत घड्याळाचे चिन्ह टाकले होते. त्यामुळे ते अजुनही अजित पवार गटाचे सदस्य असल्याचे त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला एक सडेतोड प्रश्न केला आहे. ”नवाब मलिक यांच्याबाबत आता भाजपनेच स्पष्ट करावे की ते दाऊद इब्राहीम व इक्बाल मिर्चीचे मित्र होते की नाही? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे हे गुरुवारी कुर्ला येथे एका तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारवर हल्लाबोल केला.पत्रकारांनी नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे यांनी भाजपनेच याबाबत सांगावे असे आवाहन केले आहे. ”नवाब मलिक हे दाऊदचे मित्र होते की नाही, इक्बाल मिर्चीचे पार्टनर होते की नाही हे भाजपनेच सांगावं’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या घोटाळ्यांवरून देखील निशाणा साधला. ‘या सरकारमध्ये गणवेशचा घोटाळा, रस्त्यांचा घोटाळा, काँक्रीटचा घोटाळा, खडीचा घोटाळा… हे सरकारंच घोटाळ्यांचं सरकार आहे. नुसते खोके पोहचतात यांचे बाकी काही मिळत नाही’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.