
अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डम्पिंग ग्राऊंडची ही जागा स्वच्छ व राहण्याजोगी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 2368 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिकेवर टीका करत ‘अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? असा सवाल केला आहे.
देवनारच्या जागेच्या स्वच्छतेचे टेंडर निघाल्याच्या बातमीवरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर व महापालिकेवर टीका केली आहे. ”हेच कारण आहे ज्यासाठी महापालिका कचरा संकलन व वापरकर्ता शुल्काच्या रुपात मुंबईकरांकडून अदानी कर वसूल करत आहे. जमिन – अदानीने मुंबईकडून जबरदस्ती ओरबाडून घेतली. आता ती जमीन अदानी ग्रृपच्या मालकीची असून त्यावर धारावीतीली 50 हजार नागरिकांना घरं दिली जाणार आहेत. त्या जागेसाठी व अदानीसाठी मुंबईकरांच्या कराच्या माध्यमातून मिळत असलेला पैसा वापरला जात आहे. अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईकरांवर कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली तयारी केली आहे. मुंबईकरांकडून कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केले जाणार आहे. अदानीला देण्यात येणाऱ्या देवनारची जागा स्वच्छ करून राहण्याजोगी करण्यासाठी मुंबईकरांकडून या कराच्या स्वरुपात पैसे घेतले जात आहेत, असा आरोप अनेकदा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
































































