बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज-1 मधील घरे तयार आहेत. मात्र अद्याप रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना पत्र लिहून रहिवासांना घरांचा ताबा कधी देणार असा सवाल केला आहे.

”वरळी येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 मधील तयार झालेल्या घरांचा ताबा रहिवाशांना देण्यासाठी विलंब का होतोय? याचा जाब महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल जी यांच्याकडे पत्राद्वारे मागितला”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी म्हाडाला पाठवलेले पत्रही शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी घराचा ताबा कधी देणार असा सवाल केला आहे तसेच त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरात लवकर रहिवाशांना द्यावी, अशी विनंती केली आहे.