तपोवनमध्ये साधुग्राम हवाच कशासाठी? आदित्य ठाकरे यांचा खरमरीत सवाल

नाशिकच्या तपोवनमधील झाडांची कत्तल करण्याचे फर्मान सरकारने काढले असून तपोवनसाठी हजारो झाडांची हत्या करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी, पत्रकार, कलाकार सर्वच जण एकवटले असून सरकारच्या जुलमी निर्णयाला कडाडून विरोध करत आहेत. असे असताना सरकारला तपोवनमध्येच साधुग्राम कशासाठी हवा आहे, असा खरमरीत सवाल करत युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत ती भाजपला अगदी साफ करून टाकायची आहे. साधुग्राम तपोवनमध्येच का?’ एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असे सुचवले गेले की, साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये म्हणजेच जंगलाला रेसिडेन्शिअल झोन करता येईल, टीडीआर वापरता येईल. तो व्हिडीओ आपण पाहिलात का?, बिल्डर कोण आहे?, नाशिकवर खरेच प्रेम आहे का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. हा साधूंचा नाही तर टीडीआर आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना, असा सवाल उपस्थित करत ते पुढे म्हणाले की, नाशिक महानगरपालिका जर यांच्या हाती गेली तर नाशिक विकायला काढतील हे तर स्पष्ट आहे.

भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नको

पुढे ते ट्विटमध्ये म्हणतात की, ‘हा धर्माचा पडदा आहे. 700 झाडे स्थगितीनंतर कापणार असे भाजपची बिल्डर राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे. साधुग्राम आम्हाला हवा आहे, तपोवन आम्हाला हवा आहे, पण भाजपच्या बिल्डर मित्राची दादागिरी नाही,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱयांना खडे बोल सुनावले.