सौंदर्यीकरण, सायकल-जॉगिंग ट्रॅक, पवई तलाव परिसराचा कायापालट होतोय! आदित्य ठाकरे यांच्याकडून आढावा

पवई तलाव परिसरात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱया सायकल, जॉगिंग ट्रक आणि सौंदर्यीकरणाच्या कामांमुळे या परिसराचा कायापालट होत आहे. या कामाची पाहणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आदी यावेळी उपस्थित होते. निसर्गसौंदर्य जपून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे करावीत, असे निर्देशही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

पालिकेच्या माध्यमातून पवई परिसरात सायकल ट्रक, आकर्षक फुटपाथ, पाण्याची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण अशी कामे केली जाणार आहेत. पवई तलाव म्हणजे मुंबईतील पर्यटनाचे महत्त्वाचे आणि सर्वांच्या पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे या परिसराचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ‘आयआयटी’ मुंबईकडून प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य लाभत असून या कामांकरिता पालिकेने निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

असे होतेय काम

पवई तलाव परिसराचे जतन आणि सौदर्यीकरण करताना येथे सुमारे 10 कि.मी.चा सायकल आणि जॉगिंग ट्रक तयार करण्यात येत आहे. पवई तलावालगत आकर्षक पादचारी मार्गही तयार करण्यात येणार आहे. या तलावामध्ये सांडपाणी येण्यापासून रोखणे, तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगती वायूविजन व्यवस्था, पाण्यातील वनस्पती काढण्याचे काम केले जात आहे. तलावाभोवती फिरण्यासाठी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजित आहे. तसेच निसर्ग उद्यान, आंबेडकर उद्यान आणि मोरारजी नगर मृग उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या