कोस्टल रोडचं क्रेडिट चोरलं, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या पुतळ्याचंही? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

निवडणुकांच्या तोंडावर जनतेला मोठ मोठी आश्वासनं द्यायची हाच सत्ताधाऱ्यांचा पॅटर्न आहे. आत्तापर्यत त्यांनी न केलेल्य़ा कामांवरही स्वत:चे बॅनर लावले. कोस्टल रोडचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ‘कोण किती खोटारडं असू शकतं, हे या निर्लज्जांना पाहून कळतं,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी X वर ट्वीट करत सत्ताधाऱ्यांना सुनावले. कोस्टल रोडचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता बाळासाहेबांच्या पुतळ्याचेही खोटे श्रेय घेण्यासाठी होर्डिंगबाजी केली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. या पुतळ्याची जागा आणि त्याचे स्वरूप उद्धव ठाकरे यांनीच निश्चित केले होते. याशिवाय त्याची फी देखील उद्धवसाहेबांनीच दिली. पण चोर ते चोरच… सरळ होऊच शकत नाहीत… असे आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंध्यांवरही बोचरी टीका केली. “मिंधेंच्या आरशात त्यांना स्वतःचा चेहरा तरी दिसतो की तोही चोरलेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.