जिंकल्यावर संपूर्ण देश एकत्र येतो, त्या देशासाठी BCCI एक मालिका सोडू शकत नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

”पैशाच्या पुढे देशभक्ती असते याचा बीसीसीआयने विचार करावा. क्रिकेटचा एक सामना जिंकल्यावर संपूर्ण देश एकत्र येतो, त्या देशासाठी बीसीसीआय एक सामना नाही सोडू शकत का? असा खरमरीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यावर बीसीसीआय ठाम असल्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपला व बीसीसीआयला फटकारले आहे.

”मे च्या आसपास पहलगाममध्ये हल्ला झाला. धर्म विचारून लोकांना मारलं गेलं. महिलांचं सिंदूर कसं पुसलं गेलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. पाकिस्तानने आपल्यावर कसा हल्ला केला ते सांगण्यासाठी आपल्या खासदारांना सरकारने वेगवेगळ्या देशात पाठवलं. गेले अनेक महिने पाकिस्तानला कसं एकटं पाडता येईल यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आपण पाकिस्तानला कोणतिही आर्थिक मदत मिळू नये म्हणून प्रयत्न करत होतो. कारण तिथूनच दहशतवाद पुढे येतोय. पण तरिही बीसीसीआय पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यावर ठाम आहे. आज वाजपेयींची देशभक्त भाजपा केंद्रात असती तर पाकिस्तानसोबत सामना खेळला गेला नसता. जी देशभक्तांची भाजप होती ती आता सरकारमध्ये नाही. त्यामुळे भाजपप्रणित बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानसोबत खेळायला पाठवत आहेत. पण पैशाच्या पुढे देशभक्ती असते याचा बीसीसीआयने विचार करावा. क्रिकेटचा एक सामना जिंकल्यावर संपूर्ण देश एकत्र येतो, त्या देशासाठी बीसीसीआय एक सामना नाही सोडू शकत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.