मिंधे-भाजप सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या हक्काचे सर्व रोजगार गुजरातला पळवल्याने बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अशा गद्दारांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. भ्रष्टाचार करणाऱयांनो याद राखा. आमचे सरकार आल्यावर मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांना आम्ही सोडणार नाही. प्रत्येक घोटाळय़ाची फाइल उघडून दोषींना जेलमध्ये टाकणार, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.
आदित्य ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच जोरदार भाषण करीत विरोधकांची सालटी काढली. महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवून मिंधे-भाजप सरकार ‘सुरतच्या लुटी’चा जणू बदलाच घेत असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षांसाठी शेकडो मुले प्रचंड मेहनत करीत असताना गेल्या दोन वर्षांत मिंध्यांनी एमपीएससीसह सर्वच बाबतीत बेरोजगारांची थट्टा केली असून बेरोजगारी वाढवल्याचे ते म्हणाले. आम्हाला गुजरातबद्दल द्वेष नाही; मात्र महाराष्ट्राच्या हिताचे आम्ही गुजरातला देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मिंध्यांकडून प्रत्येक काम पंत्राटदार मित्राच्या घशात घातले जात आहे. मात्र मिंधे-भाजपला साथ देणाऱया अधिकाऱयांनीही लक्षात ठेवावे की, आमचे सरकार आल्यावर आम्ही सर्व फायली उघडणार, असा इशाराही त्यांनी दिला. आमचे सरकार असताना दावोसच्या दौऱयात आम्ही 80 हजार कोटींचे उद्योग आणले. मात्र मिंधे सरकारने 20 दिवसांच्या दावोस दौऱयावर तब्बल 40 ते 45 कोटी उडवल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे.
भ्रष्टाचाऱयांना घरी बसवणार
गेल्या दोन वर्षांपासून मिंधे-भाजपकडून भ्रष्टाचाराने मुंबई, महाराष्ट्र लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. आपण गेल्या वर्षी पालिकेत सहा हजार कोटींचा घोटाळा उघड केला. यावर्षीही पाच हजार कोटींचा घोटाळा होत आहे. महाराष्ट्र लुटणाऱयांना एकतर जेलमध्ये टाकू किंवा घरी पाठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र झुकणार नाही
मुंबई-महाराष्ट्र लुटून मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र कितीही प्रयत्न करा, महाराष्ट्र कधीही झुकणार नाही. आगामी निवडणुकीत जनता तुम्हाला धडा शिकवेल. महाराष्ट्र कधीही झुकणार नाही असा इशारा देतानाच, चला, हाती मशाल घेऊ, विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.