दिल्लीत डरकाळी फोडणारे खासदार हवेत, ‘येस येस’ करणारे नकोत! आदित्य ठाकरे यांनी घेतला मिंध्यांच्या हुजरेगिरीचा समाचार

आपल्याला दिल्लीत जाऊन डरकाळी फोडणारे खासदार हवे आहेत, केवळ ‘येस येस’ करणारे नकोत, अशा शब्दांत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मिंध्यांच्या दिल्लीतील हुजरेगिरीचा समाचार घेतला. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. देशात हुकूमशाही आणि दडपशाहीच्या जोरावर भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे. मात्र आता जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार यावेळी नक्कीच बदलणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील शिवसेना शाखा भेटी उपक्रमात आदित्य ठाकरे यांनी आज मुलुंड, भांडुप परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मिंधे आणि भाजप सरकारची सालटीच काढली. गेल्या दोन वर्षांत मिंध्यांनी राज्याची वाट लावली आहे. लाखो रोजगार देणारे वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, मुंबईत होणारी वर्ल्ड कप फायनलदेखील गुजरातला पळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजरातला त्यांच्या हक्काचे मिळालेच पाहिजे. मात्र महाराष्ट्राला ओरबाडून, लुटून गुजरातला द्यायला आमचा विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या हक्काचे नेताच कसे? याविरोधातच मी लढत असल्याचे ते म्हणाले. देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे हे परिवर्तन होणारच, पेंद्र सरकार बदलणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रविरोधी भाजप, मिंधे सरकारला मतदान करू नका, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, माजी महापौर दत्ता दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलुंड विधानसभेच्या वतीने शाखाप्रमुख अमोल संसारे, उपविभागप्रमुख नितीन चौरे यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपात या, नाहीतर जेलमध्ये जा!

देशात सध्या भाजपात या, नाहीतर जेलमध्ये जा, असा प्रकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पेंद्र सरकारकडून सुरू असल्याचे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाला यांनाही अशा प्रकारेच अटक करण्यात आली आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या नावाखाली पीयूष गोयल यांनी व्यक्त केलेली संकल्पना गोरगरीब झोपडीधारकांना मुंबईतून हद्दपार करून वसई, विरारला फेकण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले.

धारावीकरांना मुलुंड येथील मिठागरावर 17 वर्षांसाठी घरे देण्याच्या नावाखाली त्यांना धारावीतून हद्दपार करून ही जागा अदानीच्या घशात घालण्याचे कारस्थान मिंधे-भाजपचे आहे. मात्र धारावीकरांना आहे त्याच जागी घर मिळालेच पाहिजे.

मिहीर कोटेचा नव्हे, मिहीर ‘खोटेचा’!

ईशान्य मुंबईत भाजपने उभे केलेले उमेदवार मिहीर कोटेचा खोटारडे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पालिकेत झालेला 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा आपण बाहेर काढलेला असताना हा घोटाळा आपणच बाहेर काढल्याचे कोटेचा यांनी सांगितले. त्यामुळे मिहीर कोटेचा नव्हे, ‘मिहीर खोटेचा’ असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. अशा खोटारडय़ाला निवडून न देता मशाल चिन्हावर लढणारे लढवय्ये संजय दिना पाटील यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. धारावीकरांना मुलुंडच्या मिठागरात टाकू नका यासाठी भाजपकडून प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे, मात्र या ठिकाणी आमदार, खासदार, नगरसेवक तुमचा, केंद्र राज्यात सरकार तुमचे असताना थेट निर्णय न घेता नौटंकी कसली करता, असा टोलाही त्यांनी लगावला.