
शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यातील माकडाच्या शिकारीचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाचा अचूक वेध घेतला आणि आपली संसदीय चुणूक दाखवली. धनुष्यबाणाने त्या माकडाला बाण मारला गेला आहे. धनुष्यबाण चुकीच्या हाती गेल्यानंतर त्याचा राज्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आता कळायला लागलंय, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्राण्यांच्या शिकारीबाबत वनमंत्र्यांना अवगत केले. मुंबई महापालिकेने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांसंदर्भात मास्टर प्लॅन प्रकाशित केला आहे; परंतु त्याची माहिती आमदार किंवा लोकप्रतिनिधींना देण्यात आली नाही असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी, ठाण्यात जखमी झालेल्या माकडाचा संदर्भ दिला.
ठाण्यात एका माकडाच्या गळय़ात स्टीलचा बाण मारला गेला आहे. वन्य भागांमध्ये आदिवासी आणि वन्यजीव एकमेकांच्या सहकार्याने राहत होते, पण आता धोक्याची घंटा वाजली आहे. वन्यजीव धोक्यात आले आहेत. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. काल एका माकडाला मारलेय, आज दुसऱया एका माकडाची माहिती येतेय. माकडाचा चेहरा पाहिला तर त्याला भयानक त्रास होत आहे. बरोबर मानेतून तो बाण गेलेला आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्याचे चित्रही सभागृहात दाखवले.
आपल्या देशात आपण वानरांना पाहिले की लगेच नमस्कार करतो. अयोध्येसारख्या ठिकाणी किंवा इतर स्थानी या वानरांबद्दल एक वेगळी श्रद्धा आहे. पण ठाण्यात माकडाला जो बाण लागलाय त्याबाबत धनुर्विद्या शिकवणाऱयावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुर्दैवाने धनुष्यबाण चुकीच्या हातात गेल्यावर त्याचा कसा वापर होऊ शकतो आणि देशावर आणि राज्यावर काय परिणाम होऊ शकतो हे कळायला लागलेले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शासनाने याची तातडीने दखल घेण्याची व कारवाई करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
‘शूट अॅट साईट’ ऑर्डर देणार का?
कुठलाही वन्यजीव माणसांवर चालून आले तर ‘शूट अॅट साईट’ ऑर्डर दिली जाते, मग माकडाला बाण मारणाऱया माणसाच्या ‘शूट अॅट साईट’ची ऑर्डर देणार का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आरे आणि येऊरमध्ये वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना शस्त्र दिली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अधिकाऱयांच्या पाहणी दौऱयांची माहिती स्थानिक आमदारांना द्यावी
शासकीय कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले जात नाही. त्यांना त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते.याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्याबाबत माहिती मागवून कारवाई करू, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यावर केवळ कार्यक्रमासाठीच नव्हे, तर अधिकाऱयांच्या पाहणी दौऱयाची ही माहिती स्थानिक आमदारांना दिली जात नाही असे आदित्य ठाकरे यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.






























































