
सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील शेतशिवार वाहून नेले. सोयाबीन, कापूस, तूर, मक्यासह खरीप हंगामाची माती झाली. संसारासोबत पशुधनही महापुरात वाहून गेले. मदतीची वाट पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. शेतकरी उपासमारीने तळमळत असताना राज्य सरकारच्या पीका विमा योजना या फक्त कागदावरच असल्याचे समोर आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारला फटकारले आहे. यासंदर्भातील एक बातमी आदित्य ठाकरे यांनी शेअर करत पोस्ट लिहली आहे. ”सत्ताधाऱ्यांची आणखी एक फसलेली योजना… पीक विमा योजना कागदावरच; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही नाही”, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.
तब्बल सहा महिन्यांनंतर पाहाणी पथक आले
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी उपासमारीने तळमळत असताना मोदी सरकारचे पथक तब्बल सहा महिन्यांनी जिल्ह्यात अवतरले. या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात काजू, बदामावर ताव मारून भरल्या पोटाने नुकसानीची पाहणी केली.
शेतकरी सुकला, पथकाचा सुक्या मेव्यावर ताव
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी रात्रीच केंद्राचे पथक डेरेदाखल झाले. सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची या पथकाला सविस्तर माहिती दिली. यावेळी पथकाच्या पाहुणचारासाठी काजू, बदामासह सुकामेवा ठेवण्यात आला होता. सुक्या मेव्यावर यथेच्छ ताव मारून या पथकाने भरल्या पोटाने उपाशीपोटी असलेल्या शेतकयांची विचारपूस केली.


























































