
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात बोलताना रस्ते अपघात व सुरक्षेवर काही महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले.
‘सध्या महामार्गावर व शहरात पेट्रोलिंग फार कमी झालं आहे. शहरात राँग साईड गाड्या चालवणे, सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढलेले आहे. याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. हायवेवर आपण बघितलं तर कुठलीही शिस्त न पाळता गाड्या चालवल्या जातात. यावर फक्त इलेक्ट्रॉनिक सर्व्हायलन्स किंवा खात्यातून पैसे जाणं हे इतक्यावरच मर्यादित न ठेवता. तातडीने तिथे अॅक्शन घेतली पाहिजे नाही तर हे विषय वाढत जातील. कारण याची पेनल्टी फार कमी आहे. त्यामुळे हे पैसे खिशातून गेले तर कुणाला फार फरक पडत नाही’, असे आदित्य ठाकरे यांनी सुचवले.
यावेळी त्यांनी मुंबई पुणे महामार्गांवरील पथदिव्यांच्या विषयही मांडला. ‘मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ एस ब्रिज आहे. तिथे लाईट्सची सोय नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो. टनेलमध्ये लाईट फारच कमी आहेत. त्यामुळे अपघात होऊ शकतो. सांगण्याची गोष्टी ही आहे की हे सगळे अपघात हे स्पीड लिमिट, सरकार काय ठरवतं, व्हीजेटीआय काय ठरवतं त्यावर अवलंबून नसतं. पण टायर आणि सिमेंट आहे की अॅसफॉल्ट मॅस्टिक आहे त्याच्यावर देखील अवलंबून असतं’, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मिंधे गटाला एक सणसणीत टोला हाणला. ‘माझी एक सूचना अशी आहे की मागच्या दोन तीन महिन्यात 40 लोकं मुंबई सुरत महामार्गावरून सकाळ संध्याकाळ पळून जात होती. या रस्त्याची क्वालिटी या सरकारने चेक करावी. तसा रस्ता बनला तर त्या रस्त्यावरून धावता येतं. पळता येतं व गुवाहटीला देखील जाता येतं’, असा टोला त्यांनी यावेळी मिंधे गटाला लगावला.































































