
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) अनेक उद्योग अडचणीत सापडल्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचे असूनही आणि त्यांच्यासोबत लोटे एमआयडीसीतील उद्योजकांनी अनेकदा चर्चा केल्यानंतरही त्यांच्या समस्या दूर झाल्या नाहीत. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे उद्या लोटे एमआयडीसीला भेट देऊन तेथील उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
आदित्य ठाकरे उद्या बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता लोटे एमआयडीसीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर लोटे येथील उद्योग भवनात उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत. उद्योगमंत्री रत्नागिरीचे असूनही रत्नागिरीचा अपेक्षेप्रमाणे औद्योगिक विकास झालेला नाही हे दुर्दैव असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. सरकार आणि उद्योगमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे रोजगार निर्मिती करणारे अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. लोटे एमआयडीसीही एक दिवस ओस पडेल असे बोलले जात आहे.
लोटे एमआयडीसीत पायाभूत सुविधांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची दुरूस्ती न होणे, स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसणे, वीज आणि पाण्याचा अनियमित पुरवठा, सांडपाणी व मलनिःसारण वाहिन्यांची स्वच्छता न होणे, कामगारांना राज्य कामगार विमा योजनेच्या दवाखान्यात पुरेशा सुविधा न मिळणे अशा अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत. ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, गाणेखडपोली पुलाचे काम, पेट्रोल व डिझेल बॅरल अथवा पिंपामधून उपलब्ध न होण्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी, लघुउद्योजकांसाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात अशी उद्योजकांची मागणी आहे. याशिवाय या एमआयडीसीमध्ये पीफाससारख्या अतिविषारी रसायनाची निर्मिती करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गेनिक या कंपनीलाही स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे आणि सरकारने आश्वासन देऊनही त्या कंपनीवर कारवाई केलेली नाही असा स्थानिकांचा आरोप आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचीही पाहणी करणार
लोटे एमआयडीसीला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरे सकाळी 11 ते 1 यादरम्यान पेण ते नागोठणे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणीही करणार आहेत. हा दौरा केवळ महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी नसून, महामार्गाच्या एकूण कामाचा दर्जा, नियोजनातील त्रुटी, धोकादायक पूल, अपुरे क्रॉसिंग, बायपास व सर्व्हिस रोडची दुरावस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.






























































