
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देणार असे सांगूनही महापालिका बारा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा करत आहे. त्याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शुक्रवार, 16 मे रोजी महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे करणार आहेत.
राज्य सरकार, महापालिका प्रशासन यांच्यामुळे शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ढिसाळ कारभारात सुधारणा व्हावी यासाठी ‘लबाडांनी, पाणी द्या।’ हे आंदोलन शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर चालवण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात पाणीजागर करण्यात आला. या आंदोलनाचा समारोप ‘हल्लाबोल महामोर्चा’ने होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सायं साडे चार वाजता क्रांतीचौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे.