कोकणातील बळीराजाला आदित्य ठाकरे यांनी दिला धीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पाऊस आणि ‘क्यार’ चक्रीवादळाने कोकणातील शेतकरी आणि मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले. शिवसेना त्यांच्या मदतीसाठी धावली असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज कोकणात जाऊन तेथील शेतकरी आणि मच्छीमारांना धीर दिला. सरकारकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

अवकाळी पावसाने कोकणातील शेतकऱयांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. कोकणातील मुख्य पीक असलेली भातशेती वाहून गेली आहे. मच्छीमारांच्या नौका वादळात बुडाल्याने मासेमारी बंद आहे. आदित्य ठाकरे यांनी शेतकरी आणि मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. आज सकाळी ते लांजा येथील कुवे गावात गेले. थेट शेताच्या बांधावर जाऊन तेथील भातशेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. राजापूरच्या उपळे गावात पावसामुळे धान्य सडले. आता काय करायचे अशा विवंचनेत असलेल्या शेतकऱयांच्या पाठीवर हात ठेवून आदित्य ठाकरे यांनी त्यांना धीर दिला.

नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत

रत्नागिरीनंतर आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिह्यातील तळेरे, नांदगाव येथे गेले. तेथेली शेतकऱयांशी चर्चा केली. नुकसान झालेल्या प्रत्येकाला भरपाई मिळवून दिली जाईल आणि त्यासाठी असणाऱया अटी-शर्तीही शिथिल करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत असा दिलासाही त्यांनी दिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार यांना सोबत घेऊन ही पाहणी करण्यात आली. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत, असेही त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.

भरपाईची रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यात

कोकणातील या पाहणी दौऱयानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. नुकसानीची रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यांमध्ये लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. या दौऱयामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर व दीपक केसरकर, आमदार उदय सामंत, राजन साळवी, वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे व अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विलास चाळके व संजय पडते आदींसह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.