
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा सांगली जिल्ह्यातील भोसे येथील 400 वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष वाचविण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान असणाऱया या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नियोजित महामार्गात बदल करून पुरातन ठेवा जतन करण्यात यावा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सांगली जिह्यातील चारशे वर्षे पुरातन वटवृक्षावर कुऱहाड चालविण्यात येणार असल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र लिहिले आहे. नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावा लागेल किंवा पर्यायी जागेवरून रस्ता करावा लागेल, असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱया ऱहासाचा विचार करता मौजे भोसे येथील महामार्गात काही प्रमाणात बदल करून वटवृक्षाचे जतन करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल पर्यावरण मंत्र्यांनी आभार व्यक्त केले आहेत. राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्त्वाचे आहे. सांगलीतील हा वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वटवृक्ष दुर्मिळ पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान
सांगली जिह्यातील मौजे भोसे गावातील गट क्र. 436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे याकडे आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले आहे.























































