आमिर खानचे ‘गुप्तदान’, पीएम व सीएम रिलीफ फंडसह मजुरांना पोहोचवली मदत

1924

कोरोना व्हायरसचे संकट वाढत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडमध्येही मदतीचा ओघ वाढत आहे. काही लोक गाजावाजा करत मदतीचा धांगोरा पिटत असतात, तर काही शांतपणे आपली सामाजिक जबाबदारी उचलत असतात. देशावर आलेल्या या संकटाच्या काळात बॉलिवूडचे कलाकारही मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकार मदत करत असताना ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचे नाव मात्र चर्चेत नव्हते. मात्र सत्य वेगळेच असून या संकटाच्या घडीत आमिरही संपूर्ण देशासोबत उभा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आमिरने पीएम केयर्स फंड आणि महाराष्ट्राच्या सीएम रिलीफ फंडमध्ये मदत दिली आहे. तसेच फिल्म वर्क्स असोसिएशन आणि काही स्वयंसेवी संस्थांनाही आर्थिक मदत पाठविली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटासाठी काम करणा-या रोजंदारी मजुरांनाही मदत केली आहे. आमिरला यासंदर्भात पब्लिसिटी नकोय, म्हणून त्याने केलेल्या मदतीची फारशी माहिती समोर आलेली नाही, असे त्याच्या जवळच्या लोकांनी म्हंटले आहे.

दिलदार आमिर
आमिर खान याने 2013 मध्ये ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात झळकलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबियांना मदत म्हणून 5 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले. 2014 मध्ये आमिरने मामी फिल्म फेस्टिव्हलला 11 लाख रुपये देऊन समर्थन केले होते. याव्यतिरिक्त, बिहार, उत्तराखंड (2013), (2017), आसाम (2017) आणि महाराष्ट्र (2019) मधील भीषण पूर स्थितीत 25-25 लाख रुपयांची मदत केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या