आमीर खान भाड्याच्या घरात राहायला जाणार, महिन्याला देणार 24.50 लाख रुपये भाडे

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला आमीर खान लवकरच भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. आमीरने मुंबईत चार महागडे फ्लॅट प्रति महिना 24.50 लाख रुपयांच्या किमतीवर भाडय़ाने घेतले आहे. हे फ्लॅट्स विल्नोमोना इमारतीत असून शाहरुख भाड्याने राहत असलेल्या ठिकाणापासून अवघ्या 750 मीटर अंतरावर दूर आहेत. वांद्रेतील शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याचे सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शाहरुख खान काही महिन्यांपूर्वीच भाड्याच्या घरात राहायला गेला आहे.

आमीर खान ज्या भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे, तेथे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटिज राहत आहेत. आमीरच्या विर्गो को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. आमीरच्या या सोसायटीमध्ये 12 अपार्टमेंट्स आहेत. विर्गो सीएचएसच्या सुशोभीकरणाचे काम एटमॉस्फियर रियल्टीकडून केले जात आहे. या ठिकाणी असलेल्या घराची किंमत प्रति स्क्वेअर फूट एक लाख रुपये आहे. त्यामुळे या सोसायटीतील घरांची किंमत 100 कोटींहून अधिक होऊ शकते.

पाच वर्षांसाठी भाडे करार

आमीर खानने हे घर पाच वर्षांसाठी भाडे करारावर घेतले आहे. विल्नोमोना येथील हे चार अपार्टमेंट मे 2025 ते मे 2030 पर्यंत लॉक इन पीरियडसाठी घेण्यात आले आहेत. या फ्लॅटसाठी आमीरने सिक्योरिटी म्हणून 1.46 कोटी रुपये मोजले आहे. या करारानुसार, दरवर्षी भाड्यात 5 टक्के वाढ होणार आहे. आमीरने या करारासाठी 4 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी मोजली आहे. तसेच दोन हजार रुपयांचे नोंदणी शुल्क मोजले आहे.