राज्यातील भाजप सरकार महाराष्ट्र-मुंबईविरोधी असून या सरकारला लोककल्याणकारी कामे करण्यासाठी वेळ नसल्याची टीका आज ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रिती शर्मा यांनी केली. सध्या ‘खोके सरकार’ कडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत, कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत.
शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करत आहे. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही, तर सर्वच आघाडयांवर आलेले अपयश ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे. बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. कृषी संकट आणि संबंधित शेतकरी आत्महत्या अव्याहतपणे सुरू आहेत. एकेकाळी भारतातील सर्वात औद्योगिक राज्य असलेले महाराष्ट्र आता जीडीपीच्या बाबतीत अग्रेसर राहिलेले नाही. करदात्याचा पैसा खाजगी सहकारी संस्थांसाठी बँक हमी म्हणून वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.