आरेतील रहिवाशांची तहान भागणार, आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांना यश

आरेतील रहिवाशांना मागील अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी 41 हजार लिटर्सची नवीन पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या पाण्याच्या टाकीमुळे येथील 8 हजार 500 स्थानिक रहिवाशांची तहान भागणार आहे. टाकी बांधण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार  आहे.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या युनिट क्रमांक 30, आरे वसाहत, गोरेगाव (पूर्व) या ठिकाणी सध्या 33 हजार 750 लिटर्स पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. या टाकीतून येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये येथील लोकसंख्येत वाढ झाल्याने हे पाणी अपुरे पडत आहे. याबाबतच्या तक्रारी स्थानिकांनी आमदार वायकर यांच्याकडे केल्या होत्या. येथील जनतेला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार वायकर यांनी ‘पी’ दक्षिण मनपा विभाग कार्यालय तसेच जल अभियंता यांच्यासमवेत बैठका घेतल्या होत्या. त्या वेळी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या तसेच पंपाच्या क्षमतेत वाढ करणे, ज्या ठिकाणी पाइपलाइन जीर्ण झाल्या आहेत अथवा नव्याने टाकाव्या लागणार आहेत, याप्रश्नी निर्णय घेण्यात आला होता. घेतलेल्या निर्णयावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना वायकर यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या.  त्यानुसार युनिट क्रमांक 30 येथे नवीन 41 हजार क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसविणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी निविदा मंजूर करण्यात आली आहे.  आरेतील सुमारे 8 हजार 500 लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे. या कामाचा शुभारंभ रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख संदीप गाढवे, बाळा तावडे, शाखा संघटक हर्षदा गावडे, अपर्णा परळकर आदी उपस्थित होते.