आरेतील झाडे तोडलीत किती, लावलीत किती? ‘एमएमआरसीएल’ची सुप्रीम कोर्टाकडून झाडाझडती

656
supreme-court

मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील झाडांवर करवत फिरवणाऱया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमआरसीएल) सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच झाडाझडती घेतली. आरेतील नेमकी किती झाडे तोडलीत, त्या बदल्यात किती लावलीत व आता किती उरलीत याचा हिशेब फोटोंसह सादर करा अशा शब्दांत न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने एमएमआरसीएलला धारेवर धरले.

मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी देताच एका रात्रीत आरेतील 2,185 झाडांच्या मुळांवर करवत फिरवण्यात आली. प्रशासनाचा हा रात्रीचा खेळ लक्षात येताच पर्यावरणवाद्यांनी तीव्र निदर्शने केली, लॉच्या काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली. सोमवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एमएमआरसीएलला पुन्हा फैलावर घेतले. तसेच आरेतील वृक्षतोडीबाबत फोटोंसह अहवाल सादर करा असा आदेश एमएमआरसीएलचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना दिला. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला घेण्याचे ठरवत तोपर्यंत वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली.

आम्ही तुमचा आदेश पाळतोय
सुनावणीदरम्यान मुंबई महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. आपण दिलेला ‘जैसे थे’चा आदेश आम्ही काटेकोरपणे पाळतोय. तुमच्या आदेशानंतर आरेतील एकाही झाडाला हात लावलेला नाही, असे ऍड. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.

आम्हाला आरेचा परिसर पाहायचाय. इथे मेट्रोच्या कारशेडशिवाय इतर कोणते प्रकल्प येणार आहेत का हेसुद्धा जाणून घ्यायचेय. आम्ही कारशेडचे बांधकाम थांबवलेले नाही. केवळ इथल्या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.
– सुप्रीम कोर्ट

आपली प्रतिक्रिया द्या