मिश्कत वर्मा साकारणार प्रतिभाशाली व्यक्तिरेखा

एका सशक्त स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरणारी काव्याएक जज्बा, एक जुनून ही मालिका सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू होत आहे. कुटुंबाची मूल्ये जपत असतानाच देशसेवा करण्याचा उद्देश मनात बाळगणाऱया काव्याचा प्रवास मांडणारी ही मालिका असून अभिनेत्री सुम्बुल तौकीर काव्या या महत्त्वाकांक्षी आयएएस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसेल. 

एक दशकाहून अधिक काळ मनोरंजनक्षेत्रात कार्यरत असणारा अभिनेता मिश्कत वर्मा या मालिकेत आदिराज प्रधानची भूमिका साकारणार आहे. आळशी, पण प्रतिभाशाली आदिराज त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर सहजतेने यश प्राप्त करणारा, महिलांच्या यशाचा आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता अशी त्याची प्रतिमा या मालिकेत पाहायला मिळेल.   

आपल्या भूमिकेबद्दल मिश्कत वर्मा म्हणतो, नवा विचार मांडणाऱया या मालिकेत सहभागी होत असल्याचा आनंद होत असून आदिराजची व्यक्तिरेखा साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे. आदिराज हा नेहमीच्या नायकांपेक्षा अगदी वेगळा आहे. ही अतिशय वास्तविक व्यक्तिरेखा आहे. तो थोडा बंडखोर, समानतेचा समर्थक आणि विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. आयुष्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नाही. मला या भूमिकेतून येणारा प्रत्येक क्षण जसा येईल तसा स्वीकारण्याची आदिराजची क्षमता आत्मसात करायची आहे.’’