अस्मा शेख हिला घर मिळवून देणार! आमदार प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

फुटपाथवर राहताना प्रतिकूल परिस्थितीशी झगडत दहावीच्या परीक्षेत 40 टक्के गुण मिळवणाऱया अस्मा शेख हिला घर मिळवून देणार, असे आश्वासन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. मुंबईसह राज्यात बुधवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यात 95 ते 100 टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थीही होते. मात्र, तरीही अस्मा शेखचे यश हे अधिक लक्षवेधी ठरले.

आझाद मैदान पोलीस ठाण्यासमोरचा फुटपाथ हेच अस्मा शेखचे घर. ना काही आडोसा ना डोक्यावर छप्पर, फुटपाथच्या लाईटखाली तिने अभ्यास करून हे यश मिळवले. याची दखल आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली. तिचे अभिनंदन करत ते म्हणाले, ‘तिला एमएमआरडीए किंवा म्हाडाकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच शिक्षण घेत पार्ट टाईम नोकरी करायची असेल तर त्यासाठीही प्रयत्न करण्याची तयारी नाईक यांनी दाखवली.

‘रस्त्यावर राहणाऱया अस्माचे 40 टक्क्यांचे हे यश निश्चितच 90 टक्क्यांहून कमी नाही. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्त्वाचे नाही. पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली, हे महत्त्वाचे आहे. रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱया वडिलांना फूटपाथवरून स्वतःच्या घरात न्यायचे तिचे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असे सरनाईक म्हणाले.

अस्मा शेखची युवासेनेकडून दखल, पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत 40 टक्के गुण मिळविणाऱया अस्मा शेख या विद्यार्थिनीची युवासेनेने विशेष कौतुक केले आहे. आझाद मैदानच्या बाजूच्या फूटपाथवर राहून उपजीविकेसाठी लिंबू सरबत विकून आस्माने दहावीची परीक्षा दिली.

शिवसेना नेते युवासेना प्रमुख राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आस्माचे विशेष कौतुक केले. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या युवती सचिव दुर्गा भोसले शिंदे यांनी आस्मा शेखच्या शिकवणी शुल्कासाठी सहकार्य केले. तसेच युवासेना कार्यकारीणी सदस्य व पालिका शिक्षण समिती सदस्य राहुल कनाल यांनी आस्माच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत वसतिगृह मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच तातडीचे सहकार्य म्हणून रूपये 21 हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, पुस्तके, कॉलेज बॅग, रेनकोट इत्यादी साहित्य भेट दिले.

आपली प्रतिक्रिया द्या