Operation Sindoor – कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड अब्दुल अझर हिंदुस्थानच्या हल्ल्यात ठार

कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अब्दुल अझरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला आहे. अब्दुलनेच इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून त्यातील प्रवाशांच्या बदल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझरसह तीन दहशवाद्यांची हिंदुस्थानच्या तावडीतून सुटका केली होती.

अब्दुल अझर हा कुख्यात दहशतवादी मसूद अझरचा लहान भाऊ होता. हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात मसूद अझरच्या घरातील दहा जण ठार झाले आहेत. मसूद या हल्ल्यातून बचावला आहे. मसूद अझर हा हिंदुस्थानच्या संसद आणि पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आहे.

इंडियन एअरलाइन्सच्या विमान IC-814 ने काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली विमानतळासाठी उड्डाण केले. मात्र संध्याकाळी 5.30 वाजता विमान हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत दाखल होताच दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर विमानाचे अपहरण केले आणि अमृतसर, लाहोर आणि दुबईमार्गे विमान अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेण्यात आले होते. या अपहरणात एका प्रवाशाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. तर 25 प्रवाशांच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांची सुटका करून घेतली होती.

मसूद अझरच्या घरातील दहा जण ठार

‘जैश’चा मुख्य तळ असलेल्या बहावलपूर येथील हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ आणि दहशतवादी रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे, तर रौफचा मुलगा हुजैफा आणि त्याची पत्नी यात ठार झाले. बहावलपूर येथील जामिया मस्जिद सुभान अल्लाह येथे हा हल्ला केला गेला. अझहरची मोठी बहीण आणि तिचा नवराही यात ठार झाले. याशिवाय आणखी एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या हल्ल्यात एकूण 26 जण ठार, तर 46 जण जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले.