अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात परतणार

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस मराठी’चा वादग्रस्त स्पर्धक अभिचित बिचुकले याला चेक बाऊन्स आणि खंडणी प्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकलेला जामीन मंजूर झाला आहे तर खंडणी प्रकरणातील तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने बिचुकले आता तुरुंगातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे आता बिचुकले पुन्हा घरात परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

अभिजीत बिचुकले यांच्या विरोधात फिरोज पठाण नावाच्या व्यक्तीने खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. तसेच त्यांच्यावर चेक बाऊन्सचा गुन्हा देखील दाखल होता. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने सतत समन्स बजावूनही बिचुकले न्यायालयासमोर हजर होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढले होते. त्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला बिग बॉसच्या घरातून अटक केली होती.

आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून फिरोज पठाण यांनी बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. त्यांनी तक्रार मागे घेण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पठाण यांनी याबाबत न्यायालयात पत्र सादर केले आहे. त्यामुळे आता बिचुकले बिग बॉसच्या घरात पुन्हा जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या