मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा औसा मतदारसंघात विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ होय. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांनी उमेदवारी मिळवली होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार बस्वराज पाटील मुरुमकर यांचा दारुण पराभव या मतदारसंघात झाला. भुमिपूत्र ही घोषणा या मतदारसंघात चालली नाही. भाजपाचे बंडखोर उमेदवार बजरंग जाधव यांचाही प्रभाव पडला नाही. 26908 मतांनी अभिमन्यू पवार यांचा विजय झाला.

राज्याच्या निवडणूक काळात औसा विधानसभा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी अपक्ष अर्ज भरलेला होता. भुमिपूत्र उमेदवार या घोषणेसह त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज राहिला तर हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात जाणार अशी चर्चा होती. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार दिनकर माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि शिवसेनेची सर्व शक्ती अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी उभी केली. अभिमन्यू पवार यांना 95140 मते मिळाली तर काँग्रेसचे विद्यमान आमदार बस्वराज पाटील मुरुमकर यांना 68232 मतांवर समाधान मानावे लागले.