>> अभिराम भडकमकर
बायोपिक तुम्हाला एका व्यक्तिमत्त्वाचंच नव्हे तर तो काळ, तो समाज, तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थिती या सगळ्यांचा एक आढावा घेण्यास मदत करतो. त्यासंदर्भातलं आपलं आकलन समृद्ध होण्याला मदत होते आणि म्हणूनच बायोपिक लोकांना आवडतात.
सध्या बायोपिकचा जमाना आहे असं म्हटलं जातं. खरं तर चरित्र गाथा मराठी साहित्याला नवीन नाहीत. धनंजय किरांनी तर किती उत्तम चरित्रे लिहिली आहेत. ‘रघुनाथाची बखर’सारखं श्री. ज. जोशी यांनी लिहीलेलं र. धों. कर्वे यांचं चरित्र आपल्याला आढळतं. अनेक नावं घेता येतील. त्यामुळे आजकाल चित्रपटाच्या माध्यमातूनही ही चरित्रं लोकांसमोर आणावीत असं वाटलं तर त्यात आश्चर्य काहीच नाही. दुसरं म्हणजे असं म्हटलं जातं की, ‘वास्तव हे कल्पितापेक्षा अद्भुत असते.’ म्हणजे लेखकांच्या कल्पनेतही जे येणार नाही ते वास्तव जगामध्ये आपल्याला दिसतं आणि त्यामुळे चरित्रपटातून दिसणारा माणूस, त्याच्या आयुष्यात आलेले चढ-उतार, त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्यातून जीवनाचं एक वेगळं आकलन प्रेक्षकांना होत राहतं. म्हणून चरित्रपटांकडे लोकांचा ओढा नेहमीच दिसत आलेला आहे. मराठीमध्ये लोकांनी प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केलेला चरित्रपट म्हणजे मी लिहिलेला ‘बालगंधर्व!’ या चरित्रपटानंतर मराठी संगीत रंगभूमीकडे तरुणाई पुन्हा उत्साहाने वळली. त्यांच्या मोबाईलमध्ये कॉलरटय़ून्स नाटय़ संगीताच्या ऐकू येऊ लागल्या. आता असाच दुसराही एक माझा चरित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ‘रघुवीर.’ गंमत म्हणजे पहिल्या चरित्रपटाच्या नायकाचे नावही नारायण. म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस आणि याही चरित्र नायकाचे नाव नारायणच. नारायण ठोसर. म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी!
ज्यांनी माणसाच्या मनाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी समाजामध्ये बलोपासनेचे महत्त्व निर्माण केले. आपली देवळं आणि आपलं तत्त्वज्ञान वाचवायचं असेल, आपल्या संस्कृतीचे रक्षण करायचं असेल तर शास्त्र महत्त्वाचं आणि शस्त्रही महत्त्वाचं, हे ज्यांनी बिंबवले असे मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक, तत्त्वचिंतक आणि कार्यप्रवण संत रामदास स्वामी!
समर्थ रामदास स्वामींसारख्या विविध पैलू असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे रेखाटन करताना मर्यादा येतातच. अहो समर्थांच्या एकेका पैलूबद्दल म्हणजे दोन तास कमी पडतील. अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, चित्रपट निर्माण करणाऱयांना चरित्र नायकाच्या आयुष्यातील कोणकोणते पैलू महत्त्वाचे वाटतात त्यावर भर देणं अपरिहार्य ठरतं. अगदी ‘गांधी’ चित्रपटाचेसुद्धा उदाहरण घ्या. त्यामध्ये कितीतरी गोष्टी वगळाव्या लागल्या. दिग्दर्शकाला जे गांधी उभे करायचे होते किंवा त्याला जे गांधी दिसले ते तो मांडत राहतो. हेच अन्यत्रही होतं.
बायोपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे अभिनेत्याची निवड. तो अभिनेता किंवा अभिनेत्री त्या व्यक्तिमत्त्वाच्या किती जवळपास जाते दिसण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे ठरते. आमच्या ‘बालगंधर्व’ बायोपिकमध्ये सुबोध भावे हा चेहरेपट्टीनुसार गंधर्वांच्या सारखा नसला तरी गंधर्वांचे अनुपम सौंदर्य हे सुबोधमध्ये लोकांना आढळलं आणि लोकांना तो बालगंधर्व वाटला. ‘गांधी’ चित्रपटामध्ये बेन किंग्जले या अभिनेत्याने आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली आणि देहबोलीसुद्धा त्याने गांधींसारखी साकारली. त्यामुळे तो पाश्चात्य अभिनेतासुद्धा आपल्याला हिंदुस्थानी अगदी महात्मा गांधीच वाटले.
इरफान खान या अभिनेत्याने एक नाटक केले होते. ‘ब्ल्यू हॉर्स ऑन रेड ग्रास’ या नाटकात तो लेनीनची भूमिका करायचा. तो मुळीच लेनीनसारखा दिसत नव्हता, तर दिग्दर्शकाने एक छान क्लुप्ती केली. सुरुवातीलाच निवेदनामध्ये जेव्हा इरफानची एन्ट्री होईल तेव्हा एक पात्र लोकांना सांगे, ‘हा लेनीनची भूमिका करणार आहे, पण तो लेनीन मात्र मुळीच दिसत नाही.’ मग हसून ते पात्र म्हणे की, ‘लेनीन इथे नाही’ असे म्हणून ती चेहऱयाकडे बोट दाखवे. ‘इथे आहे’ असे म्हणून ती त्याच्या डोक्याकडे म्हणजे मेंदूकडे इशारा करे. म्हणजे लेनीनसारखा अभिनेता दिसत नसला तरी त्याचे विचार हे या नाटकांमध्ये अधिक महत्त्वाचे आहेत. पण नाटकांमध्ये अशा गमती करता येतात, तशा चित्रपटांमध्ये होत नाहीत. मधल्या काळामध्ये बायोपिकची जोरदार लाट आली आहे. अशा वेळेला अनेक ठिकाणी कोणालाही धरून पकडून भूमिका दिलेल्या आपल्याला आढळतात. पण मग अशा वेळी अभिनेत्याला चेहऱयाचा विचार न करता त्या पात्राचा मूड, त्या पात्राचं व्यक्तिमत्त्व, देहबोली याचा विचार करावा लागतो.
मी एका नाटकात एक भूमिका केली होती. ते नाटक मी लिहिताना मी एक जवळ जवळ सवासहा फूट उंचीचा पहाडी नेता डोळ्यांसमोर ठेवला होता. पण ऐनवेळी ती भूमिका करणाऱया नटाचा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ती भूमिका कुणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आणि ते मी करावे अशी सूचना आली. मी सरांना म्हटलं हे कसं शक्य आहे? शारीरिक साधर्म्य नको का? तर सर म्हणाले फक्त असा विचार कर की, हजारो लोकांच्या समूहासमोर उभ्या असलेल्या या माणसाचं लोक का ऐकतात? केवळ तो धिप्पाड आहे आणि त्याचा आवाज अत्यंत खणखणीत आहे म्हणून? की आणखी काही? कुणी सांगावं एखादा लहानखुरा माणूसही संपूर्ण समाजाला, देशालासुद्धा नेतृत्व देऊ शकतो आणि त्यांनी मला लालबहाद्दूर शास्त्राRचे उदाहरण दिलं. बायोपिक करताना चेहरा जितका महत्त्वाचा तितकंच त्या माणसाचं अंतरंग जाणून घेऊन ते आपल्या देहबोलीतून व्यक्त करणं महत्त्वाचं. आमच्या ‘रघुवीर’ चित्रपटामधला विक्रम गायकवाड हे करण्यात चांगलाच यशस्वी होतो आणि त्यामुळे चित्रपट पाहता पाहता लोकांना समर्थ रामदास स्वामी हेच विक्रमसारखे वाटू लागतात.
एकूणच बायोपिक त्याच्या मर्यादा आणि बलस्थानांसह त्यासंदर्भातलं आपलं आकलन समृद्ध होण्याला मदत करतात आणि म्हणूनच बायोपिक लोकांना आवडतात. असे चरित्रपट आणि चरित्र नायक समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे व आनंददायी ठरतात.
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)