मोदी-शहा गप्प, पण आम्ही घरात घुसून मारू; पाकिस्तानच्या पोकळ धमकीला अभिषेक बॅनर्जींचे चोख प्रत्युत्तर, केंद्र सरकारवरही निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यानंतर हिंदुस्थानमधील राजकारण चांगलेच तापले असून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा गाजत आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत पाकिस्तानलाही घरात घुसून मारू असा इशारा दिला आहे. ते सिलिगुडी येथील प्रचार सभेमध्ये बोलत होते.

ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे बोलताना हिंदुस्थानला पोकळ धमकी दिली होती. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये भविष्यात युद्ध झाल्यास ते सीमेपुरते मर्यादित राहणार नाही. आम्ही थेट कोलकात्यावर हल्ला करू, अशी धमकी आसिफ यांनी दिली होती. हिंदुस्थानने कोणतीही कारवाई केल्यास आम्ही घरात घुसून मारू असेही ते म्हणाले हगोते. याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत अभिषेक बॅनर्जी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्या दिवशी ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू, असे ते म्हणाले.

यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधत पाकिस्तानच्या धमकीनंतर ते गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी ख्वाजा आसिफ यांनी कोलकाता उडवून देण्याची भाषा केली. आमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री मात्र यावर गप्प आहेत. मी माझ्या यादीत ख्वाजा आसिफचे नाव नोंदवले आहे. ज्या दिवशी केंद्रात आमचे सरकार येईल, त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करू, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

पाकिस्तान कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी देत आहे आणि पंतप्रधान मोदी कूचबिहारमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. ते पाकिस्तानी मंत्र्याला उत्तर देण्याऐवजी टीएमसीला हटवण्याचे आवाहन करत आहेत. गृहमंत्री अमित शहा आम्हाला रोज बांगलादेशी आणि पाकिस्तानी म्हणतात, पण जेव्हा पाकिस्तान कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतो, तेव्हा ते गप्प बसतात, असा टोलाही अभिषेक बॅनर्जी यांनी लगावला. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला होता.

पाकिस्तान कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतोय आणि मोदी अवाक्षर काढत नाहीत! ममता बॅनर्जी यांची विखारी टीका… तुम्हाला लाज वाटत नाही का?

दरम्यान, पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.